वाहनांची तोडफोड, दगडफेकीमुळे नंदूरबारमध्ये तणाव
| नंदूरबार | प्रतिनिधी |
नंदूरबारमध्ये एका हाणामारीत आदिवासी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आता नंदूरबार जिल्ह्यात वातावरण तापले आहे. या हाणामारीत सहभागी असलेल्यावर तसेच तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे. याच मागणीसाठी अनेक आदिवासी संघटना तसेच हजारो आदिवासी बांधव आक्रमक झाले असून, नंदूरबार शहर बंद ठेवण्यात आले आहे. आदिवासी बांधव आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले असून, आता या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली असून आता नंदूरबारमध्ये तणावाची स्थिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यासाठी हजारो आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जमा झाले आहेत. या वेळी आंदोलकांच्या हातात अनेक फलके होती. याच आंदोलनाला आचानक हिंसक वळण लागले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची मोडतोड केली. काही प्रमाणात दगडफेक झाल्याचीही घटना घडली. या घटनेनंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी ही आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. यामुळे काही काळासाठी नंदूरबार जिल्हाधिकारी परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांची तोडफोड केली आहे. सोबतच आंदोलनलाा हिंसक वळण लागल्यामुळे काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस दलाकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या आंदोलनात वीस ते बावीस हजार आंदोलक सामील झाले होते. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनासोबतच काही आंदोलकांनादेखील इजा झाली आहे.







