महावितरण कार्यालयावर मूक मोर्चा

| नेरळ | प्रतिनिधी |

वाढीव वीज बिले, सतत खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाला आहे. यामुळे वीज संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जत महावितरण कार्यालयावर आयोजित केलेल्या मुक मोर्चाला कर्जत तालुक्यातील जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिला. मोर्चा मध्ये संतप्त ग्राहक यांची शेकडो ने उपस्थिती असल्याने मुक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे थांबविण्यात आला.

या मुक मोर्चातील सहभागी सात महिला पदाधिकारी ॲड. भावना पवार, सुनिता जाधव, सुषमा लाड, दिपाली पिंगळे, भारती कांबळे, मनीषा गायकवाड, सुजाता भानुसघरे, शर्वरी कांबळे, शुभांगी गायकवाड यांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता एम.के. माने आणि उप अभियंता प्रकाश देवके यांच्याकडे निवेदन सादर केले असून महवितरण कंपनीकडून सर्व विषय मार्गी लावण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली. त्याचवेळी महावितरण कंपनीकडून समस्यांचे निराकरण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मुक मोर्चानंतर 1 ऑगस्ट पासून महावितरण कंपनीचे विरोधात साखळी उपोषण आणि 15 ऑगस्ट पासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version