महिला तिरंदाजांना अपयश
| मेक्सिको | वृत्तसंस्था |
महाराष्ट्राच्या प्रथमेश जावकरने कारकीर्दीत प्रथमच तिरंदाजीच्या विश्वचषक अंतिम स्पर्धेत खेळताना कम्पाऊंड प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत प्रथमेशला डेन्मार्कच्या मथियास फुलर्टनकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेसाठी प्रथमच भारताचे पाच तिरंदाज पात्र ठरले होते. यात कम्पाऊंड प्रकारातच दोन पुरुष आणि दोन महिला खेळाडूंचा समावेश होता. ऑलिम्पिक प्रकार असलेल्या रीकर्व्हमध्ये केवळ एक पुरुष खेळाडू पात्र ठरला होता. कम्पाऊंड प्रकारात प्रथमेश रौप्यपदकाचा मानकरी ठरला, पण महिला तिरंदाज ज्योती सुरेख वेन्नम आणि आदिती स्वामी या दोघी पदकापासून दूर राहिल्या.
या वर्षी विश्वचषकाच्या शांघाय येथील टप्प्यात विजेता ठरलेल्या प्रथमेशने चार महिन्यांच्या अंतराने दुसऱ्यांदा जगज्जेत्या माईक शोलेसरचा (150-149) असा एका गुणाने पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. प्रथमेशकडून पराभव पत्करावा लागल्याने या स्पर्धेत सलग तिसरे विजेतेपद मिळवण्याचे शोलेसरचे स्वप्न भंगले. विजेतेपदाच्या लढतीत जावकरला मात्र फुलर्टनकडून टायब्रेकरमध्ये पराभव पत्करावा लागला. नियोजित लढतीत 148-148 अशी बरोबरी राहिली होती. शूटऑफमध्येही (10-10) बरोबरीची कोंडी फुटू शकली नाही.
या स्पर्धेच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या ज्योती सुरेखा व्हेन्नम आणि आदिती स्वामी यांना मात्र अपयश आले. ज्योतीला पहिल्या फेरीतच कोलंबियाच्या बलाढ्य सारा लोपेझकडून 144-149 असा, तर आदितीला डेन्मार्कच्या तंजा गेल्लेन्थिएनकडून नियमित लढतीतील 145-145 अशा बरोबरीनंतर शूट-ऑफमध्ये 9-10 असा पराभव पत्करावा लागला.