तनिषा वर्तकची धनुर्विद्यामध्ये रौप्यपदक

पहिल्याच प्रयत्नात राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तुंग यश

| अलिबाग | वार्ताहर |

खेळाची आवड आणि कौटुंबिक पाठिंबा असला की सर्वोत्तम खेळाडू बनण्याचा ध्यास कितीही अडचणी असल्या तरी पूर्ण करता येतो ह्याचे उत्तम उदाहरण 6 जानेवारी 2024 रोजी कै.राजाराम भिकू पठारे इनडोअर स्टेडीयम खराडी पुणे येथे संपन्न झालेल्या फील्ड आर्चेरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा फिल्ड आर्चेरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या 13 व्या राज्यस्तरीय फिल्ड इनडोअर आर्चेरी स्पर्धेमध्ये अलिबागच्या तनिषा मंदार वर्तक हिच्या वतीने पाहायला मिळाला. रायगड जिल्ह्यात नेहुली येथे उभारलेल्या क्रीडासंकुलाची सद्यस्थितीमध्ये झालेली दुरावस्था तसेच इनडोअर स्टेडीयम उपलब्ध नसताना देखील नागावसारख्या गावातून तयारी करीत तनिषा वर्तक हिने महाराष्ट्र राज्यातील 25 जिल्ह्यातून तब्बल 450 स्पर्धकांमधून द्वितीय क्रमांक पटकावित सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. शिवाय या विजयामुळे ती राष्ट्रीय स्पर्धेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. विशेष म्हणजे धनुर्विद्या (आर्चरी) या खेळप्रकारामध्ये राज्यात यश संपादन करणारी तनिषा ही रायगड जिल्ह्यातील पहिली मुलगी ठरली आहे. तनिषाच्या या यशाचे कौतुक संपूर्ण राज्यातून होत असून शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी देखील तिचे अभिनंदन आणि विशेष कौतुक केले.

तनिषा वर्तक ही अलिबाग तालुक्यातील नागाव गावची रहिवासी असून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांची द्वितीय कन्या आहे. मंदार वर्तक यांनी यावेळी तनिषाच्या शाळेचे म्हणजे सेंट मेरी शाळेचे देखील आभार व्यक्त करताना शाळेमध्ये तिला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक यतिराज पाटील,अमोल सर यांचे आभार व्यक्त करीत बावलेकर आर्चरी अकादमी अलिबाग, केळकर प्रशिक्षण विद्यालयाचे प्रमुख संतोष जाधव यांचे विशेष धन्यवाद व्यक्त केले आणि त्यांच्या सहकार्यामुळे तनिषाच्या कामगिरीमध्ये सातत्य राहिले असेही आवर्जून सांगितले.

14 वर्षाखालील गटात तिने हे यश संपादन करताना केवळ दुसर्‍याच फेरीत आपले यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे तनिषा वर्तक हिने या अगोदर जिल्हा स्तरावर देखील लोधीवली ता-खालापूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत पहिला क्रमांक प्राप्त करीत सुवर्णपदक संपादन केले होते. तनिषाच्या या राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविल्याने रायगड जिल्ह्यातील अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा मिळणार असून तिच्या या यशात तिला सदैव साथ देणारे तिचे वडील मंदार वर्तक आणि आई मीरा वर्तक यांचा पाठिंबा अधिक महत्वाचा आहे असे मत तनिषाचे मार्गदर्शक संतोष जाधव यांनी व्यक्त केले. तसेच तनिषाची निवड आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली असून यापुढे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी देखील अधिक जोमाने तयारी करेल असे सर्वांना आश्‍वासित केले.

Exit mobile version