अनिल परब यांची घोषणा
| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर हल्ला करणार्या 109 कर्मचार्यांना एसटीची नोकरी गमवावी लागणार आहे. तशी घोषणाच परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यानी केली आहे. घरातील आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले त्यांना सेवेत घेणार नाही, अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे की, येत्या 22 तारखे पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाचे आहेत. 22 तारखेपर्यंत जे कामगार रुजू होतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. या आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही. 22 तारखे पर्यंत कामगार कामावर आले नाहीत तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का याचा विचार ही केला जाईल. 5 महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस अगाराने पूर्ण बसेसची तपासणी केली आहे. एस टी महामंडळ बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण पणे सज्ज आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अधिकार्याची उचलबांगडी
या हल्ल्याच्या तपासादरम्यान काही वेगवान हालचाली घडत असताना आता गामदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजभर यांनाही हटवण्यात आले आहे. याआधी या घटनेनंतर पोलीस उपायुक्त योगेशकुमार गुप्ता यांची बदली करण्यात आली होती. या मोर्चाची माहिती मीडियाला मिळाली मात्र पोलिसांना याची खबर का नव्हती, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. पोलिसांची भूमिका संशयित असल्याचं आरोप होत आहे. आज सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या दरम्यान संबंधित कारवाई झाली आहे.




