। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान नगरपरिषदेच्या कार्यालयात मागील चार महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्याने येथील स्थानिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून आपली कामे पूर्ण करण्यासाठी कार्यालयात फेर्या मारून वेळ वाया जात असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी प्रशासक राजवटीत अनेक कामे पूर्ण केली जात होती कारण याठिकाणी स्वतः मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून कार्यरत असणार्या सुरेखा भणगे यांनी समस्त लोकांच्या तक्रारीचे वेळोवेळी निरसन केले होते. मार्च महिन्यात त्याची बदली झाल्यानंतर इथे संपूर्ण वेळ मुख्याधिकारी नाहीत.
कर्जत येथील मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे माथेरान नगरपरिषदेचा प्रभारी कारभार दिलेला आहे. पण त्यांना कामानिमित्त बाहेर जावे लागत असल्याने कार्यालयात अधिकारीच नसल्याने कामगार वर्गावर कुणाचेही नियंत्रण नाही. कार्यालयातील कामगारांवर अंकुश ठेवण्यासाठी कुणीही नाही त्यामुळे नागरिक सुध्दा आपली कामे घेऊन येत नाहीत. दिवसेंदिवस अनेक समस्या उभ्या रहात असताना त्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयात अधिकारी नाही. अनेक दिवसांपासून मुख्य रस्त्यावर पथदिवे बंद अवस्थेत आहेत, क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते खड्डेमय होत आहेत. याच रस्त्यावर सातत्याने रहदारी सुरू असते पण त्यावर नागरिक सुध्दा आवाज उठवत नाहीत. शासनाने लवकरच इथे मुख्याधिकारी नेमणूक करणे गरजेचे आहे स्थानिक आमदारांनी तरी निदान या गावाकडे लक्ष केंद्रित करावे जेणेकरून इथल्या नागरिकांसह पर्यटकांना भेडसावत असणार्या समस्या दूर होऊ शकतील असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.