मलेशिया मास्टर्स स्पर्धेत फॉर्मात येण्याची संधी
। क्वालालम्पूर । वृत्तसंस्था ।
गुडघ्याच्या दुखापतीमधून बरी होत बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन करणार्या पी. व्ही. सिंधूला मागील सहा स्पर्धांमध्ये प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. याप्रसंगी पॅरिस ऑलिंपिकआधी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारताची फुलराणी सज्ज झाली असेल. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा मंगळवार पासून सुरू होत आहे. महिला एकेरीत सिंधूच्या खेळाकडे तमाम बॅडमिंटनप्रेमींच्या नजरा खिळलेल्या असणार आहेत.
पी. व्ही. सिंधूने उबेर करंडक व थायलंड ओपन या दोन स्पर्धांमधून माघार घेतली. तसेच, मागील सहा स्पर्धांमध्ये तिच्याकडून प्रभावी कामगिरीही झालेली नाही. दोन स्पर्धांमध्ये तिला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली. सिंधूने शेवटचे जेतेपद 2022मध्ये मिळवले. सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर तिला अजिंक्यपदापासून दूरच राहावे लागले आहे. मागील वर्षी झालेल्या स्पेन मास्टर्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात तिला यश मिळाले होते; पण त्या वेळी तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.दिग्गज खेळाडूंची अनुपस्थितीअॅन सी यंग, चेन यु फेई, अकाने यामागुची व कॅरोलिना मरीन या दिग्गज महिला बॅडमिंटनपटूंची अनुपस्थिती असल्यामुळे पी. व्ही. सिंधूला मलेशिया मास्टर्स स्पर्धेत फॉर्मात येण्याची संधी असणार आहे. युवा खेळाडूंविरुद्ध खेळून ती आपला फॉर्म कमवू शकणार आहे. प्रकाश पडुकोण यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ती सराव करीत आहे.
पी. व्ही. सिंधूसह महिला एकेरीमध्ये अश्मिता छलीहा, आकर्षी कश्यप, मालविका बन्सोड या खेळाडूंकडूनही भारतीय संघाला आशा असणार आहेत. या सर्व खेळाडू बराच काळ आंतरराष्ट्रीयस्तरावर खेळताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या खेळामध्ये सुधारणा अपेक्षित आहे.