सिंधू , प्रणोयची विजयी सलामी

दुहेरीत भारतीय खेळाडूंची निराशा

। सिंगापूर । वृत्तसंस्था ।

पी.व्ही. सिंधू व एच.एस. प्रणोय या भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटूंनी सिंगापूर ओपन स्पर्धेतील पहिल्या फेरीत प्रतिस्पर्ध्यांवर दमदार विजय मिळवला. सिंधूने महिला एकेरीच्या लढतीत लाईन जेरफेल्ट हिच्यावर 21-12, 22-20 अशी मात केली. प्रणोय याने पुरुषांच्या एकेरीत ज्युलियन कॅरागी याचे कडवे आव्हान 21-9, 18-21, 21-9 असे परतवून लावले. लक्ष्य सेन याला मात्र पुरुषांच्या एकेरीत हार पत्करावी लागली.

भारताची फुलराणी पी.व्ही. सिंधूला मागील आठवड्यात मलेशिया मास्टर्स स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, दुखापतीनंतर बॅडमिंटन कोर्टवर तिला शानदार पुनरागमन करता आले नव्हते. मलेशिया स्पर्धेत तिने उपविजेतेपद मिळवत पॅरिस ऑलिंपिकसाठी आत्मविश्‍वास मिळवला. आता सिंगापूर स्पर्धेची सुरुवातही तिच्याकडून जबरदस्त झाली आहे. सिंधूने सरळ दोन गेममध्ये लाईन जेरफेल्ट हिला पराभूत केले. एच.एस. प्रणोय याला विजयासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले. त्याने ज्युलियन कॅरागी याच्यावर तीन गेममध्ये रोमहर्षक विजय मिळवला व पुढल्या फेरीत प्रवेश केला.

कडवी झुंज अपयशी
भारताच्या दोन अनुभवी खेळाडूंना बुधवारी निराशेला सामोरे जावे लागले. किदांबी श्रीकांतने माघार घेतली, तर लक्ष्य सेनचा पराभव झाला. अव्वल मानांकित व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेन याने सेन याचा संघर्ष 21-13, 16-21, 21-13 असा परतवून लावला. श्रीकांतसमोर पाचवा मानांकित कोडाल नाराओका याचे आव्हान होते. 21-14, 11-3 असा गुणफलक असताना श्रीकांतने माघार घेतली. त्यामुळे नाराओकाला विजयी घोषित करण्यात आले.
दुहेरीत भारतीय खेळाडूंची निराशा
भारतीय खेळाडूंना दुहेरी विभागातील लढतीत अपयश आले. सिमरन सिंघी-रितिका ठक्कर, सतीशकुमार-आद्या वारीयाथ, सुमीत रेड्डी-सिक्की रेड्डी, व्यंकट प्रसाद-जुही देवांगन, तनीषा क्रॅस्टो-अश्‍विनी पोन्नाप्पा या सर्व जोडींचा पराभव झाला. त्यामुळे त्यांचे आव्हान बुधवारीच संपुष्टात आले.
Exit mobile version