ऑलिम्पिक मधील आवाहन संपुष्ठात
। पॅरिस । वृत्तसंस्था ।
भारताची स्टार बॅडमिंटन पटू पी.व्ही. सिंधू हिला गुरूवारी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. 2016 ची रौप्यपदक विजेती आणि 2020च्या कांस्यपदक विजेत्या सिंधूला तिसरे ऑलिम्पिक पदक जिंकता आले नाही. चीनच्या खेळाडूने सरळ गेममध्ये तिचा पराभव केला आणि भारतीय खेळाडूचे आव्हान संपुष्टात आणले.
सहाव्या मानांकित बिंग हे हिने 9-5 अशी आघाडी घेत सिंधूवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चिनी खेळाडूने नेट जवळ जोरकस फटके मारून सिंधूला कोर्टवर खेळवले आणि 11-9 अशी आघाडी कायम ठेवली. यानंतर सिंधूने मॅच चुरशीची केली आणि गेम 12-12 असा बरोबरीत आणला. 15-18 अशा पिछाडीनंतर सिंधूने दोन सलग गुण घेतले आणि अविश्वसनीय पुनरागमन करून 19-19 अशा बरोबरीवर गेम आणला. दोन्ही खेळाडूंमध्ये जबरदस्त रॅली रंगली, परंतु चिनी खेळाडूने पहिला गेम 21-19 असा जिंकला. दुसर्या गेममध्ये पिछाडीनंतर सिंधू जबरदस्त खेळली. मात्र, चिनी खेळाडूने 21-14 असा विजय मिळवून सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.
या पराभवानंतर सिंधूने भावनिक पोस्ट लिहिली की, हा पराभव माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण आहे. मी पराभूत झाले हे सत्य स्वीकारायला वेळ लागेल, पण आयुष्यात पुढे जात असताना मी त्याच्याशी जुळवून घेईन, याची मला खात्री आहे, असे सिंधूने लिहीले.