। क्लालालंपूर । वृत्तसंस्था।
विश्रांतीनंतर परतणार्या दोन ऑलिंपिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स सुपर बॅडमिंटन स्पर्धेत दुसर्या फेरीत प्रवेश केला. स्कॉटलंडच्या किर्स्टी गिलमोरवर तिने पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. सिंधू सध्या जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर आहे. ऑलिंपिकपूर्वी विश्रांती मिळावी म्हणून तिने उबेर करंडक स्पर्धेतून माघार घेतली होती.
पहिल्या फेरीत तिने गिलमोरवर 21-17, 21-16 असा विजय मिळवला. गिलमोर जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर आहे. सिंधूला विजयासाठी 46 मिनिटे पुरेशी ठरली. या स्पर्धेत पाचवे मानांकन असलेल्या सिंधूने आपली अखेरची स्पर्धा सिंगापूर ओपन 2022 मध्ये जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत तिला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. आता दुसर्या फेरीत तिचा सामना कोरियाच्या सिंम यू जिन हिच्याविरुद्ध होणार आहे. गिलमोरवर सिंधूने मिळवलेला हा तिसरा विजय आहे. गिलमोर ही राष्ट्रकुल स्पर्धेतील दोनदा पदक विजेती खेळाडू आहे. या सामन्यात तिच्यावर सिंधूचे वर्चस्व अपेक्षित होते. तिने पहिल्या गेमध्ये 7-1 अशी आघाडी घेतली खरी; परंतु गिलमोरने तेवढाच जोरदार प्रतिकार केला आणि 14-14, 15-15 अशी बरोबरी साधली. मात्र, सिंधूने पुढे सलग आठ गुण मिळवत पहिला गेम जिंकला.
कोर्टमधील जागा बदलल्यानंतर सिंधूचा खेळ अधिक आक्रमक झाला. तिने गिलमोरला प्रतिकाराची संधी ठेवली नाही. 3-0 आणि बघता बघता 11-6 अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला. जुलै महिन्यात होत असलेल्या पॅरिस ऑलिंपिकसाठी सिंधूला फॉर्म मिळणे महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर तिने जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; परंतु काही सामन्यांत तिला निसटत्या पराभवांना सामोरे जावे लागले. मिश्र दुहेरीत बी सुमीत रेड्डी आणि सिक्की रेड्डी या जागतिक क्रमवारीत 53 व्या स्थानावर असलेल्या भारतीयांनी दुसर्या फेरीत प्रवेश करताना हाँगकाँगच्या लुई चेन वेई आणि फु चेई वॅन यांचा 21-15, 12-21, 21-17 असा 47 मिनिटांत पराभव केला. सुमीत आणि सिक्की हे पती-पत्नी आहेत.