गेटवे ऑफ इंडिया परिसरात रंगणार स्पर्धा; महाराष्ट्रातील जलतरणपटू सज्ज
| मुंबई | प्रतिनिधी |
अथांग अरबी समुद्राच्या निळ्याशार लाटांवर जलतरणपटूंच्या जिद्दीचा आणि साहसाचा थरार अनुभवण्याची वेळ आली असून, प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ’62 वी संक रॉक ओशन स्विमॅथॉन 2026′ रविवारी, 22 फेब्रुवारी 2026 रोजी दिमाखात पार पडणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात रंगणाऱ्या या महास्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या हस्ते होणार आहे.
‘महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर क्वेटिक असोसिएशन’ यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक स्पर्धेचे नियोजन असोसिएशनचे अध्यक्ष आनंद माने आणि सरचिटणीस राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंनी रविवारी सकाळी 7:30 वाजता रिपोर्टिंग करणे आवश्यक असून, प्रत्यक्ष शर्यतीची सुरुवात साधारणपणे 10:30 ते 11:30 या वेळेत होणार आहे. सर्व सहभागी खेळाडूंना सकाळी 9:00 वाजता बोटीने प्रस्थान करणे अनिवार्य आहे. 1 किमी अंतराची शर्यत 8-9 वर्षे वयोगटातील बालजलतरणपटू आणि दिव्यांग खेळाडूंसाठी (खुला वयोगट) राखीव आहे. 2 किमी अंतराची शर्यत 10-11 वर्षे, 12-13 वर्षे आणि 46-55 वर्षे वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली आहे. तर सर्वात आव्हानात्मक 5 किमी अंतराच्या शर्यतीत 14-15 वर्षे, 16-25 वर्षे आणि 26-45 वर्षे वयोगटातील पुरुष व महिला जलतरणपटू समुद्राच्या लाटांशी दोन हात करताना दिसतील.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख पारितोषिके, गुणवत्ता ई-प्रमाणपत्र, आकर्षक भेटवस्तू आणि पहिल्या तीन क्रमांकांसाठी पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, 1 किमी, 2 किमी आणि 5 किमी अंतरातील सर्वात वेगवान पुरुष आणि महिला जलतरणपटूंना प्रतिष्ठेची ‘फास्टेस्ट स्विमर ट्रॉफी’ आणि ‘रोलिंग ट्रॉफी’ प्रदान करून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान केला जाणार आहे. ही ट्रॉफी जिंकणे म्हणजे जलतरणपटूंसाठी सर्वोच्च गौरव मानला जातो. स्पर्धेदरम्यान सहभागी सर्व जलतरणपटूंच्या सुरक्षिततेसाठी विशेष वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित बचाव पथके आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. समुद्रातील आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेता आयोजकांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन केले आहे, ज्यामुळे खेळाडूंना सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण वातावरणात स्पर्धा करता येईल.
जलतरणपटूंना मोठी संधी
महाराष्ट्राच्या जलतरण कौशल्याचे प्रदर्शन होणार असल्यामुळे या ऐतिहासिक स्पर्धेत महाराष्ट्रातील जलतरणपटूंना समुद्रात आपले कौशल्य सिद्ध करण्याची आणि राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सरचिटणीस राजेंद्र पालकर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, या भव्य स्पर्धेला उपस्थित राहून जलतरणपटूंचा उत्साह वाढवावा आणि त्यांच्या धाडसी प्रयत्नांना पाठिंबा द्यावा.







