सर डॉन ब्रॅडमन! क्रिकेटचा नव्हे, ऑस्ट्रेलियन जनतेचा खरा डॉन

काही माणसं अशी असतात की त्यांचं कर्तृत्व चराचरात व्यापलेले असते. त्यांची स्मृतिस्थळं उभारण्याची गरज नसते. दिग्गज क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांच्याबाबतीतही असं म्हणता येईल. परिसस्पर्शाची सिद्धी देऊनच देवाने जणू या माणसाला पृथ्वीवर पाठविलं असावं. कारण डॉन उत्तम टेनिसपटू होते. डॉन दर्जेदार स्क्वॉश खेळाडू होते. टेबल टेनिस विजेते होते. बिलिअर्डस् चॅम्पीयन होते. अत्युत्तम गोल्पपटू होते. क्रीडा क्षेत्रातील हे कौशल्य अपुरं की काय म्हणून त्यांना देवाने संगीत क्षेत्राचेही ज्ञान देऊन पाठविले होते. खर्‍या अर्थाने परिसस्पर्श लाभलेल्या या महान क्रिकेटपटूचे ऑस्ट्रेलियात स्मृतीस्थळ नाही. 2 होल्डन स्ट्रीट, केंसिंग्टन पार्क, अ‍ॅडिलेड पूर्व येथील त्यांचे वास्तव्य होते. ते घर, हेच त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारं स्मृतिस्थळ.

तब्बल 65 वर्षे डॉन यांचे अ‍ॅडिलेडमधील या घरात वास्तव्य होते. पत्नी जेसीसोबत त्यांनी संसार केला. क्रिकेट या खेळाप्रमाणे डॉन अन्य खेळांमध्येही दिग्गज होऊ शकले असते, पण त्यांनी क्रिकेट या खेळाची निवड केली, हे क्रिकेटचे भाग्य.

खेळातील उंचीपेक्षाही विचारांच्या आणि कृतीच्या उंचीनेही ते मोठे होते. याचा प्रत्यय त्यांचे वास्तव्याचे ठिकाण पाहताना मला आला. सर्वसाधारणपणे कुणीही आपले नावं घराच्या प्रवेशद्वारावर लावतोच. डॉन बॅडमन याचे 2, होल्डन स्ट्रीट येथील घराला नाव नाही. मला वाटलं होतं, बंद गेटवर कुठेतरी, लहान अक्षरात डॉन बॅ्रडमन लिहिलेले असेल. पण अपेक्षाभंग झाला.

त्यांचा मुलगा, जॉन जवळच राहतो. तो घराची देखभाल करतो. कधी कधी राहतो देखील. पण डॉन यांच्या इच्छेचा मान म्हणून त्यांच्या घराला जराही प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न होत नाही. स्थानिक कॉलिलने हे घर ऑडिलेडचा पुरातन मौल्यवान ठेवा असलेल्या यादीत टाकले खरे. मात्र डॉन यांच्या इच्छेमुळे त्यांना डॉन यांचा पुतळाही तेथे उभारता आला नाही. एवढंच नव्हे तर गेटवर 2, होल्डन स्ट्रीट अशी पाटीही नाही. त्यामुळे शेजारच्या मार्गारेट अ‍ॅटिलन आजींच्या घरावरील, 2अ, होल्डन स्ट्रीट या पाटीवरुन अंदाज बांधता येतो व क्रिकेटच्या या खर्‍या खुर्‍या देवाचे देवालय (घर) आपल्याला ओळखता येते. या मार्गारेट अजीही नव्वदीत येऊन पोहोचल्या आहेत. त्या म्हणत होत्या, डॉन पूर्णपणे सर्वांपासून अलिप्त राहणारे होते. एव्हढे अलिप्त होते की त्यांच्याकडे पाहुणे आलेले देखील आम्ही, त्यांना त्यांच्या खाजगी फोनवर फोन करुन सांगायचो. मग गेट उघडले जायचे. घरचा फोन उचलण्यास, बोलण्यास नोकरचाकरांनाही मनाई होती. मात्र मार्गारेट आजी आणि जेस्सी ब्रॅडमन यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. 1997 साली जेस्सी वारली. तोपर्यंत आम्ही एकमेकींशी गप्पा मारायचो, भेटायचो.

असं पूर्णपणे खाजगी आयुष्य जगलेला हा महान क्रिकेटपटू प्रत्येक ऑस्ट्रेलियनांच्या मनात, हृदयात मानाचे स्थान राखून आहे. कारण 1930 च्या सुमारास ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळ होता, उपासमारीमुळे जनता बेहाल होती. रोजगार नव्हते. बेकारीमुळे संपूर्ण समाजच डिप्रेशनमध्ये होता. अशा त्या अंधारकायमय वातावरणात डॉन ब्रॅडमन यांची फलंदाजी, त्यांचे विक्रम आणि इंग्लिश क्रिकेटवर केलेली कुरघोडी, निराशेच्या गर्तेतील समाजाला आशेचा किरण वाटायला लागली. हळूहळू डॉनचा प्रत्येक धावेने, उच्चांकाने विक्रमाने, खचलेल्या ऑस्ट्रेलियन मानसिकतेला बळ मिळायला लागले. जो समाज मानसिकतेच्या आजाराने पछाडला होता, त्या डॉनरुपी संजीवनी मिळाली.

डॉन यांची 29 शतके कसोटीतील धावांची 99.94 ही सरासरी एका दिवसात झळकाविले. त्रिशतक किंवा अन्य त्रिशतके यापेक्षाही ऑस्ट्रेलियन नागरिक ऋणी आहेत. त्यांच्या क्रिकेट कर्तृत्वाने, फटकाविले या धावांनी उच्चाकांनी दिलेल्या आत्मविश्‍वासाबद्दल आत्मसन्मानाबद्दल. आणि म्हणूनच डॉन ब्रॅडमन यांचे सेडियम परिसरातील पुतळे वगळता त्यांची ओळख सांगणारे काहीही सापडणार नाही. 65 वर्षे वास्तव्य असणारे त्यांचे घर पहायला मग आपल्यासारखे क्रिकेट रसिक क्रिकेटचे भक्त, वारकरी येतात. डॉन ब्रॅडमन मात्र ऑस्ट्रेलियन जनतेच्या मनात राहतात. जे पाहता येत नाही, याचा अनुभवता येतं ऑस्ट्रेलियन जनतेच्या भावनाविश्‍व स्वरांमधून.

Exit mobile version