रांजणखार डावली ग्रामस्थांनी केली मागणी
| रायगड । प्रतिनिधी ।
रांजणखार डावली ग्रामपंचायत हद्दीत असणारे स.न. 49 व स.न. 53/1 या मिळकतीमधील क्षेत्र गावठाण विस्तार योजनेअंतर्गत गावठाणाकरिता उपलब्ध करून मिळावे आणि मिळकतीमधे होत, असलेले बेकायदेशीर अतिक्रमण व विक्री व्यवहार यांची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली, ग्रामस्थांनी अलिबाग तहसीलदार यांच्याकडे केली आहे. याबाबत अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अलिबाग पंचायतसमितीचे माजी सभापती प्रकाश पाटील, माजी सरपंच विलास भगत, माजी उपसरपंच अविनाश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित पाटील, सुजित पाटील, केतन पाटील आदी रांजणखार डावलीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
रांजणखार डावली हे गाव गेली अनेक वर्षे दुर्लक्षीत अवस्थेमध्ये आहे. या गावाची लोकवस्ती 2500 ते 3000 पर्यंत आहे. सदर, गावाचे गावठाण हे खुप कमी क्षेत्राचे आहे. या कारणाने या गावातील घरे ही खुप दाटीवाटीने बांधलेली असुन, ती एकमेकाला लागुन आहेत. गावामधे अनेक गैरसोई आहेत. पाणी, वीज, रस्त्यांसारख्या मुलभूत सुविधादेखील गावास योग्य प्रकारे प्राप्त नाहीत. भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली, तरी गाव मुलभुत सुवीधांपासुन वंचित आहे. शिवाय गावाची लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, गावातील अनेक कुटूंबांना जागेअभावी घरे बांधणे गैरसोईचे होत चालले आहे. गावातील लोक बहुतांशी गरीब असल्याने त्यांना घरासाठी जागा विकत घेणे अशक्य आहे. यामुळे लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रांजणखार डावली येथील स. नं. 49 या जमीनीचे क्षेत्र मोठे असुन सदर क्षेत्राची मिळकत रांजणखार डावली या गावालगत आहे. सदर जागा ही पडीक आहे. तेथे काहीही विकासकामे होत नाहीत. सदर स. नं. 49 हे क्षेत्र गावठाणाकरीता सहज उपलब्ध होऊ शकते. तसे झाल्याने गावातील अनेक कुटूंबाना घरांपासून वंचित रहावे लागणार नाही, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
रांजणखार डावली स. नं. 49, क्षेत्र 74.69.28 व स. नं. 53/1, क्षेत्र 21.97.40 या सरकारी जागांमधील काही क्षेत्रामध्ये काही मोजक्या लोकांनी जाणुनबुजून अतिक्रमण केलेले आहे. या जमिनीवर कच्च्या स्वरूपाचे कंपाऊंड करून ते क्षेत्र धनदांडग्यांना विक्री करत आहेत. या भूमाफियांवर शासनामार्फत दंडात्मक स्वरूपाची कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. एकतर जागा शासकीय असून, तेथे अतिक्रमण होत आहे. याप्रकारे अतिक्रमण होऊन जमिनीची विक्री झाल्यास रांजणखार डावली ग्रामस्थांना भविष्यात गावठाणासाठी जागा उपलब्ध होऊ शकणार नाही व गावठाण नसल्याकारणाने अनेकजण घरांपासून वंचित राहून अनेक कुटुंबाना गाव सोडून जाणे भाग पडेल, असे निवेदनात म्हटले आहे.







