मिळविले कारकीर्दितील सर्वोच्च रेटींग; 674 रेटींगसह 15व्या क्रमांकावर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा इंग्लंड दौरा मोहम्मद सिराजने खऱ्या अर्थाने संस्मरणीय बनवला आहे. पाचव्या कसोटीत काहीही करून भारताला विजय हवा होता; परंतु, यजमान इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. तिथून सिराजने त्यांना मागे ओढले अन् भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. पाच सामन्यांच्या मालिकेत सिराजने सर्वाधिक 23 बळी घेतले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत सिराजने कारकीर्दितील सर्वोच्च रेटींग मिळवले आहेत. त्याच्यासह प्रसिद्ध कृष्णानेही रेटींगमध्ये सर्वाधिक गुणांची कमाई केली आहे. सिराज 674 रेटींगसह 12 स्थानांच्या सुधारणेसह 15व्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्रसिद्ध कृष्णानेही पाचव्या कसोटीत सिराजचा तोडीसतोड साथ दिली आणि याच कामगिरीच्या जोरावर त्याने कारकीर्दितील सर्वोत्तम 368 रेटींग गुण मिळवले. प्रसिद्ध 25 स्थानांच्या सुधारणेसह 59 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज गस एटकिन्सन व जोश टंग यांच्याही क्रमवारीत सुधारणा झाली आहे आणि ते अनुक्रमे 10 व 46 व्या क्रमांकावर पोहोचले आहे. कसोटी गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह ( 889) अव्वल स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, न्यूझीलंडचा मॅट हेन्री व ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड हे अव्वल पाचमध्ये आहेत.
ओव्हल कसोटीतील शतकवीर यशस्वी जैस्वालने आठव्या क्रमांकावरून थेट पाचव्या स्थानी झेप घेतली आहे आणि तो भारताचा क्रमांक 1चा कसोटी फलंदाज ठरला. यशस्वीने कारकीर्दितील सर्वाधिक 792 रेटींग गुण कमावले आहेत. इंग्लंडचा जो रुट व हॅरी ब्रूक हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. न्यूझीलंडचा केन विलियम्सन व ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हे यशस्वीच्या पुढे आहेत. रिषभ पंतला एक स्थान खाली सकरून आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे, तर शुभमन गिल चार स्थान खाली घसरला आहे. तो 13 व्या स्थानावर आहे.







