बहिणींची तहसील कार्यालयावर गर्दी

| म्हसळा | वार्ताहर |

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर तहसील कार्यालयावर बहिणींनी अर्ज भरणे व त्यासाठी लागणारे कागद पत्र मिळविणे यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. शासनाच्या नवीन सुधारित आदेशानुसार 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात बहिणींच्या रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे शाळा, महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने पालकांचीही आवश्यक दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात झुंबड सुरू आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या गर्दीत विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी आवश्यक दाखले मिळविताना पालकांची दमछाक होत आहे.

या योजनेचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. सध्या शाळा, महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने तहसील कार्यालयातून विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी पालकांचे हेलपाटे सुरू आहेत. मात्र, महिलांची तहसील कार्यालयात गर्दी वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले मिळविण्यास उशीर होत आहे. याबाबत पालकवर्गात नाराजीचा सूर आहे. सेतू कार्यालयात विद्यार्थीवर्गासाठी वेगळी खिडकी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version