बहिणींची बँकेत गर्दी

नवीन खाते उघडण्यासाठी लगबग सुरु

। अलिबाग । प्रतिनिधी ।

‘लाडकी बहीण’ या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात एक हजार 500 रुपये जमा होणार आहे. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत लागला आहे. जिल्ह्यातील अनेक महिलांची बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी तसेच बंद असलेले खाते नव्याने चालू ठेवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे बँक कर्मचार्‍यांची दमछाक होऊ लागली आहे.

राज्य सरकारने एक जुलैपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बहिणींची गर्दी उसळली आहे. रायगड जिल्ह्यातील विविध भागात ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत कार्यालयांसह जिल्ह्यातील सेवा केंद्रामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होत असताना, या योजनेसाठी लागणारे बँक पास बुक झेरॉक्स, खाते क्रमांक आदींची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे काही महिलांनी बँक खाते उघडले नसल्याने त्यांची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत तसेच सरकारी बँकांमध्ये नवीन खाते उघडण्यासाठी महिलांची बँकेसमोर रांग दिसून येत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बँकेसमोर गर्दी होत आहे. तर, यापूर्वी ज्या महिलांनी बँक खाते उघडले होते. परंतु, त्याचा वापर केला नाही. त्यामुळे ते खाते नव्याने चालू ठेवण्यासाठीदेखील महिलांची लगबग सुरु झाली आहेत. त्यासाठी केवायसी करण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. जिल्ह्यातील अनेक बँकांमध्ये महिलांची गर्दी वाढल्याने बँक कर्मचार्‍यांची दमछाक होऊ लागली आहे. दैनंदिन कामांबरोबरच या योजनेसाठी नवीन खाते उघडण्यासाठी व बंद असलेले खाते चालू ठेवताना कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत होत आहे. जिल्ह्यातील बँकामध्ये दोनशेहून अधिक खाते उघडण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

अंगणवाडी सेविकादेखील लागल्या कामाला
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला एक हजार 500 रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे. या योजनेचा लाभ बहिणींना मिळावा यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकादेखील कामाला लागल्या आहेत. गावागावात महिलांच्या बैठका घेऊन योजनेची माहिती देणे, त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज भरणे, लागणारी कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरु केले जात आहे. त्यामुळे शैक्षणिक कामाव्यतिरिक्त या योजनेच्या कामांचा भार अंगणवाडी सेविकांवर पडला आहे.
Exit mobile version