खालापुरात तहसील कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन

खोपोली | प्रतिनिधी |
राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा आणि जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी शुक्रवारी खालापूर तहसील कर्मचार्‍यांनी तहसील आवारात एक तास ठिय्या आंदोलन केले. राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना रायगड यांनी शुक्रवारी संपूर्ण राज्यात एक तासासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनाचे पत्र दोन दिवस अगोदर तहसीलदार आयुब तांबोळी यांना देण्यात आले होते.
राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचार्‍यांचे सन-2018 पासून विविध मार्गांनी आंदोलन सुरू आहे. जानेवारी 2020 ला देशव्यापी संपदेखील करण्यात आला होता. त्यानंतर महसूल विभागाचे लेखणीबंद आंदोलनदेखील झाले होते. जुनी पेन्शन योजना, केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणारे सर्व लाभ राज्य कर्मचार्‍यांना मिळावे, राज्य सरकारी कर्मचार्‍यांना 10 टक्के शासन अंशदानऐवजी 14 टक्के रकमेची वजावट आयकर एकूण उत्पन्नातून अनुज्ञेय करावी, पूर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन आलेल्या तसेच 2005 पूर्वी निवड झालेल्या, परंतु उशिरा नियुक्ती मिळालेल्या कर्मचार्‍यांना परिभाषित पेन्शन योजना लागू करा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Exit mobile version