टक्केवारी घेणार्‍या आमदाराला घरी बसवा- शेकाप सरचिटणीस जयंत पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

हजारो कोटी रुपये आणल्याच्या बाता या आमदारांनी मारल्या आहेत. निधीची तरतूद नसताना ठेकेदारांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. दाखविलेल्या स्वप्नांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. ज्यांनी कामांसाठी गुंतवणूक केलेली रक्कम मिळाली नाही, तर या आमदाराच्या घरावर शेण मारतील. त्यामुळे ही घाण गेली पाहिजे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. नाना कुंटेंपासून दत्ता पाटील, खानविलकर, मधुकर ठाकूर यांनी विधानभवनात अलिबागचा सन्मान कायम ठेवला आहे. टक्केवारी घेणार्‍या आमदाराला घरी बसवा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची अलिबागमधील बिगस्प्लॅश हॉटेलमधील सभागृहात चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी (दि. 6) बैठक घेण्यात आली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील, रोह्याचे माजी नगराध्यक्ष तथा तालुका प्रमुख समीर शेडगे, पिंट्या उर्फ अमिर ठाकूर, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. गौतम पाटील, हेमंत पाटील, कमलेश खरवले आदींसह महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना फोडण्याचे काम गद्दारांनी केले. उध्दव बाळासाहेब ठाकरेंसोबत सर्व निष्ठावंत कार्यकर्ते राहिले. त्यामुळे शिवसेना पक्षाला अधिक चांगले बळ मिळाले.

अलिबाग विधान मतदारसंघात मागील निवडणुकीत ज्यांना निवडून दिले, त्या गद्दारांनी निष्ठावंत शिवसैनिकांची फसवणूक केली. ज्यांना पक्ष, जनतेशी बांधिलकी नाही, विचार, निष्ठा नाही, अशा गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका. त्यामुळे या निवडणुकीत बदलाची भावना ठेवून जिद्दीने काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीत शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस व इतर घटक पक्ष आहेत. एकत्रित काम केले तर सव्वा लाखाहून अधिक मते चित्रलेखा पाटील यांना मिळतील, असा विश्‍वास आहे. ज्यांनी पक्ष बदलला, ज्यांनी खोके घेतले, त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. नागररिकांमध्ये तीव्र संताप आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मते देऊन ते गद्दारांबद्दल राग नक्की व्यक्त करतील.

अलिबागचा आमदार म्हणून विधानसभेत एक वेगळा सन्मान आहे. संपूर्ण महाराष्ट्र अलिबागच्या आमदारांकडे एक वेगळ्या नजरेने पाहतो. परंतु, या आमदाराने पाच वर्षांत विधानसभेत एकही प्रश्‍न मांडला नाही. साधी आमसभादेखील घेतली नाही, त्यामुळे स्वतःचे हित साधणार्‍या या आमदाराला घरी बसवा, असा टोला महेंद्र दळवी यांचे नाव न घेता लगावला.

चित्रलेखा पाटील या शेतकरी कामगार पक्षाच्या असल्या तरी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. एक उच्चशिक्षित, विविध क्षेत्रात काम करणारी कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांची ख्याती आहे. जनतेचे प्रश्‍न मांडून ते सोडविण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे. कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील घटकाला न्याय देण्याचे काम त्या नक्की करतील. एक प्रभावी आमदार म्हणून त्यांचे काम विधानसभेत नक्कीच उल्लेखनीय राहील, असा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

गद्दारांना चिखलात लोळवा : चित्रलेखा पाटील
महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांचे बळ आणि कार्यकर्त्यांची साथ या निवडणुकीत माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे हा विजय निश्‍चित आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना गद्दार सोडून गेले. परंतु, उध्दव बाळासाहेब ठाकरे दिल्लीसमोर कधीही झुकले नाहीत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून मराठी माणसासाठी संघर्ष केला. कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले. स्वतःची प्रकृती बरी नसतानादेखील महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्यांनी काम केले. म्हणूनच एकजुटीने काम करून या गद्दारांना चिखलात लोळवायचे आहे. आमदार म्हणून निवडून आल्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली.
चित्रलेखा पाटील यांना निवडून देणार : शेडगे
मातोश्रीवरून आदेश आल्यावर शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार या निवडणुकीत कार्यकर्ते जोमाने काम करून चित्रलेखा पाटील यांना निवडून देतील. महाविकास आघाडीसाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघात चांगले वातावरण आहे, असे प्रतिपादन उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी केले.
चिऊताईंसाठी जोमाने काम करणार : सुरेंद्र म्हात्रे
मातोश्रीच्या आदेशानुसार या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्यासाठी काम करायचे आहे. चित्रलेखा पाटील यांना निवडून देण्यासाठी मोठ्या ताकदीने प्रत्येक कार्यकर्ता जोमाने काम करणार आहे. चाळीस हजारांहून अधिक मते देण्याचा प्रयत्न राहणार आहे. ही निवडणूक गद्दारांच्या विरोधात आहे. महाविकास आघाडीची एक ताकद अशीच ठेवून या निवडणुकीत चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना एक लाखाहून अधिक मतांनी निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा, असे आवाहन उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी केले.
Exit mobile version