कशेळेतील खून प्रकरण सहा आरोपींना ठोकल्या बेड्या

केवळ 36 तासांत पोलिसांनी लावला छडा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्सचे मालक हरिष उर्फ हरिसिंग माधोसिंग राजपूत,(38 वर्षे, रा. ठाकुर्ली, कल्याण, जि.ठाणे ) यांच्या हत्येचा तपास रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि नेरळ पोलीस ठाणे यांनी छत्तीस तासात लावून मुख्य आरोपीच्या सोलापूर-कर्नाटक सीमेवर मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हरिष उर्फ हरिसिंग माधोसिंग राजपूत हे नेहमीप्रमाणे सायंकाळच्या वेळस दुकान बंद करून कशेळे येथून नेरळ रेल्वे स्टेशन येथे त्यांची मोटारसायकल लावून रेल्वेने ठाकुर्ली येथे घरी जात असत. असा त्यांचा नित्यक्रम होता. दि. 3 डिसेंबर रोजी हरिष राजपुत हे घरी वेळेत न पोहोचल्याने त्यांची पत्नी व नातेवाईक नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच्या वेळी नेरळ-कशेळे रस्त्यावर शोध घेत असताना त्यांना जिते गावच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला गवतामध्ये एक बजाज डिस्कव्हर मोटारसायकल पडलेली दिसून आली. जवळ जाऊन पाहिले असता हरिष राजपूत हे मयत अवस्थेत शेतामध्ये पडलेले मिळून आले. त्यांच्या पोटावर, छातीवर, मानेवर, डाव्या पायावर व हातावर धारदार हत्याराने वार करून जिवे ठार मारल्याचे दिसून आले. याबाबत नेरळ पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, कर्जत विभाग यांनी भेट देऊन गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याकरिता वेगवेगळी चार पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केले असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व त्यांच्या पथकांनी तांत्रिकदृष्ट्या सी.डी.आर.चे अवलोकन, सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून 36 तासांच्या आत आरोपी जनार्दन विठ्ठल कराळे, रोशन लक्ष्मण धुळे, (दोन्ही रा.मु. सावळे, पो. मांडवणे, ता. कर्जत, जि. रायगड) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी व त्यांचे विरार येथील चार साथीदार यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्यांना दि. 7 डिसेंबर 2022 रोजी अटक करण्यात आलेली आहे.

त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे व त्यांचे पथक यांनी विरार येथे राहणारे गुन्ह्यातील आरोपी सनी मनमोहन गिरी, सूरज दिपक जाधव, तानाजी बाबुराव चौगुले यांना शिताफीने विरार येथे ताब्यात घेऊन त्यांना दि.9 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचा साथीदार छगनाराम भिमारामजी पटेल, रा. सोलापूर हा सोलापूर येथे असल्याची माहिती मिळताच आरोपी यास नेरळ पोलीस ठाण्यातील सहा. फौजदार गिरी, पोलीस हवालदार म्हात्रे, पोलीस शिपाई बारगजे यांनी सोलापूर येथून ताब्यात घेऊन नेरळ पोलीस ठाणे येथे आणल्यानंतर त्यास दि.14 डिसेंबर रोजी अटक करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे उघडकीस नसलेला आव्हानात्मक गंभीर गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून गुन्ह्यातील सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे गुन्ह्यातील मयत व्यक्तीची बॅग, मोबाईल फोन, आरोपी यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली स्कुटी व काळ्या रंगाची झायलो कार असे वाहन जप्त करण्यात आलेले असून, सदरचा गुन्हा कट रचून खुनासह दरोडा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर हे करीत आहेत.

सदरचा गुन्हा हा सावळे येथील स्थानिक राहणारे आरोपी जनार्दन विठ्ठल कराळे, रोशन लक्ष्मण धुळे यांनी कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्स दुकान लुटण्याच्या उद्देशाने सोलापूर येथील राहणारा आरोपी छगनाराम भिमारामजी पटेल याला टिप देऊन त्याचे विरार येथील साथीदार आरोपी सनी मनमोहन गिरी, सूरज दिपक जाधव, तानाजी बाबुराव चौगुले साथीदार यांच्यासह गुन्हेगारी कट रचून सदरचा गुन्हा केलेला आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, रायगड अलिबागचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पो. निरी. राजेंद्र तेंडूलकर, सपोनि. नागेश कदम, पो.उप निरी. महेश कदम, श्रीकांत काळे, स्थागुअ. शाखेकडील सहा. फौज. दिपक मोरे, पोहवा. राजेश पाटील, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, प्रशांत दबडे, राकेश म्हात्रे तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे सहा. फौज. गणेश गिरी, पोहवा. शकद फरांदे, निलेश वाणी, पो.ना. घनशाम पालवे, भाऊ आघाण, नेरळ पोलीस ठाणे तसेच अक्षय पाटील सायबर सेल यांनी चांगली कामगिरी केलेली आहे.

Exit mobile version