रोहा पोलीस दलाल लॉबीच्या दबावाखाली
उल्का महाजन यांचा गंभीर आरोप
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील अनेक जमीन घोटाळे पुन्हा समोर येण्यास प्रारंभ झाला आहे. चणेरातील करोडो रुपये किंमतीची सरकारी दिव जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर शिलोशी गाव हद्दीतील जमीन घोटाळा सर्वहारा जनआंदोलनाने उघड केला. जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड यांच्या आदेशान्वये अखेर जमीन गैरव्यवहारप्रकरणी तब्बल सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याची घटना घडली. जमीन फसवणूकप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याने दलाल लॉबीला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सर्वहारा जनआंदोलनाच्या पाठपुराव्याने तातडीने संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याने संबंध जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. तर, रोहा पोलीस दलाल लॉबीच्या दबावाखाली काम करीत आलेत, अनेक जमीन घोटाळे समोर आले, मात्र रोहा पोलिसांनी संबंधितांवर कधीच गुन्हे दाखल केले नाहीत, पोलीस राजकीय दबावाखाली आहेत, असा गंभीर आरोप प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता उल्का महाजन यांनी केला.
तालुक्यातील चणेरा विभागात बल्क ड्रग्ज फार्मासाठी भूसंपादन सुरू आहे. त्यासाठी दलालांचा मोठा सुळसुळाट नव्याने सुरू आहे. दिव जमीन महाघोटाळा प्रकरणात दलाल मालामाल झाले. सर्वाधिक मोठा दिव जमीन गैरव्यवहार प्रकरण सर्वहरा जनआंदोलनाने समोर आणले. त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि खाजण जमीन पुन्हा सरकारी जमा झाल्याची घटना घडली. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा दलालांनी मयत पणजोबा, आजोबा जिवंत करून कोल्हटकर कुटुंबाची जमीन परस्पर विकण्याचा घाट घातला. गट नंबर 152 क्षेत्र 00-32-90 आर ही जमीन परस्पर विकण्यात आली. गणेश कोल्हटकर यांचे पणजोबा हशा नागू कोल्हटकर 1975 साली मयत झाले. त्यांच्या जागी तोतया इसम उभा करून 2011 रोजी कोल्हटकर कुटुंबियांची जमीन विकण्यात आली. याबाबत गणेश कोल्हटकर यांनी सर्वहारा जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि धक्कादायक प्रकरण समोर आले. तक्रार करूनही रोहा पोलिसांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली नाही. याउलट दुसर्या प्रकरणात दत्ता कांबळे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कांबळे यांच्या वृद्ध आईलाच आरोपी केले. त्या अपंग व निरक्षर आहेत, अशी माहिती कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिली. ज्या शेतकर्यांची दलालांनी फसवणूक केली. त्या दलालांवर गुन्हे दाखल होऊ नयेत असे काम रोहा पोलिसांनी नेहमीच राजकीय दबावाखाली केले. त्यामुळे आम्ही या गंभीर प्रकरणाकडे खुद्द जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड यांचे लक्ष वेधले, प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानुसार गुरुवारी संबंबितांवर गुन्हा दाखल झाले आहे.
पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पीडित शेतकर्यांना भेट दिली. त्या बैठकीत शेतकर्यांचे प्रश्न समजून घेऊन तातडीने संबंबितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. नंतर गणेश कोल्हटकर यांच्या फिर्यादीनुसार भगवान घोडे, गिरीष सिनकार यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चणेरा यांसह संबंध तालुक्यात जमीन गैरव्यवहार प्रकरणे घडली आहेत. त्याची दखल संबंधित विभाग घेत नाही. सरकारी जमीनही परस्पर विकण्याचा सपाटा सुरू आहे, हे दिव प्रकरणातून समोर आले. दिव प्रकरणात तत्कालीन नायब तहसीलदार सिराज तुळवे व मंडळ अधिकारी लहाने यांचे निलंबन झाले होते. त्यामुळे कोल्हटकर जमीन गैरव्यवहार प्रकरणातील तत्कालीन तलाठी व अन्य अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणे गंभीर आहेत. त्याची पोलीस कधीच दखल घेत नाही, राजकीय व दलालांच्या दबावाखाली पोलीस काम करतात असा आरोप कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केल्याने कुंपणच शेत खाते याची प्रचिती सर्वांनाच आली. आता जमीन गैरव्यवहारप्रकरणी आरोपींवर काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन, सोपान सुतार, चंद्रकांत गायकवाड, भारत खाडे, महेंद्र पाटेकर, अतुल पाटील व कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने संबंध जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.