तळोजात सहा जनावरे बेशुद्धावस्थेत

इंजेक्शन देऊन दोराने झाडांना बांधले; तळोजा पोलिसांत गुन्हा दाखल

| पनवेल | प्रतिनिधी |

तळोजा गावाजवळ पनवेल-मुंबई महामार्गालगत जामा मशिदीसमोर सिडकोच्या भूखंडावर सहा गोवंशीय जनावरे दयनीय व बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तळोजा पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक रत्नाकर बबनराव पाटील यांच्या तक्रारीनुसार, गस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी चार बैल आणि दोन गायी आढळून आल्या. यातील एका बैलासह दोन गायींना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या शिंगांना, गळ्याला तसेच तोंडाला नायलॉनच्या दोऱ्या बांधून त्यांना झाडांना बांधून ठेवण्यात आले होते. उर्वरित जनावरेही दयनीय अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जनावरांना अशा प्रकारे बेशुद्ध करून बांधून ठेवण्यामागील नेमका उद्देश काय, याचा तपास तळोजा पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळी आढळलेल्या जनावरांबाबत पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या प्रकारामागे कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

Exit mobile version