। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महापालिकेत पूर्वाश्रमीच्या ग्रापंचायतीमधील 324 कर्मचार्यांचा तीन वर्षापूर्वी महापालिकेत समावेश करण्यात आला होता. यावेळी कर्मचार्यांना तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. याबाबत वारंवार सांगूनही सहा लिपिकांनी तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्याने महापालिकेच्या आस्थापना विभागामार्फत या लिपिकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
महापालिकेत समाविष्ट ग्रामपंचायत कर्मचार्यांना पूर्णवेळ भरतीसाठी लढा द्यावा लागला होता. स्थानिक पातळीपासून मंत्रालयापर्यंत हे कर्मचारी लढले. मात्र, सहा कर्मचार्यांना किरकोळ बाबींची पूर्तता करता आली नाही. इंग्रजी, मराठी टायपिंग, एमएससीआयटी प्रमाणपत्र हे कर्मचारी सादर करू न शकल्याने आज घरी बसण्याची वेळ आली आहे. वारंवार सांगून, पत्रव्यवहार करूनही या कर्मचार्यांनी तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली. सुरेश चंदन, दर्शना म्हात्रे, शिवाजी चिपलेकर, योगेश केणी, आकाश पाटील आणि अक्षय म्हात्रे अशी सहा लिपिकांची नावे आहेत. बडतर्फ केलेल्या सहा कर्मचार्यांना शेवटचा पर्याय न्यायालय उरला आहे. न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार या कर्मचार्यांना आहे. न्यायालयामार्फत मुदतवाढ घेऊन या लिपिकांना तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जाईल.







