। सांगली। प्रतिनिधी।
तासगाव मणेराजुरी महामार्गावर चिंचणीजवळ मध्यरात्री अल्टो कार ताकारी कॅनॉलमध्ये कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हा अपघात झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले असून मोठी खळबळ उडाली आहे.
तासगावमधील राजेंद्र पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे या गावातून नातीचा वाढदिवस साजरा करुन आपल्या कुटुंबसह परत येत होते. यावेळी तासगाव मणेराजुरी महामार्गावर चिंचणीजवळ मध्यरात्री गाडीवरील ताबा सुटल्याने कार कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. या अपघातात कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील (60), पत्नी सुजाता राजेंद्र पाटील (55), प्रियांका अवधूत खराडे (30), नात ध्रुवा (3), राजवी (2), कार्तिकी (1) यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्नाली विकास भोसले या जखमी झाल्या आहेत. आज सकाळच्या सुमारास चिंचणी गावातील काही लोक मॉर्निंग वॉकसाठी गेले असता, हा भीषण अपघाताचा प्रकार समोर आला.