| महाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी टोळ येथे आणि नडगाव हद्दीत अपघात झाला. दोन्ही अपघातामध्ये एकूण सहा प्रवासी जखमी झाले आहेत. दोन्ही अपघातातील जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताची नोंद एमआयडीसी पोलिस आणि महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी महाड तालुक्यातील टोळ गाव हद्दीत एका इको कारला अपघात होऊन चार प्रवासी जखमी झाले, तर तालुक्यातील नडगाव गाव हद्दीत एका वॅगनर कारला झालेल्या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने मुंबई ते महाड जाणारी इको कार ही शनिवारी सकाळी साडेपाच वाजता महाड तालुक्यातील टोळ गाव हद्दीतील पुलावर आल्यानंतर चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने समोर जाणाऱ्या एका अज्ञात कंटेनरला मागू धडक बसली. या अपघातात चालक सुरज दिलीप जाधव, प्रवासी माया प्रकाश जाधव, विलास सखाराम महाडिक आणि मनीषा प्रकाश मोहिते असे चार जण जखमी झाले. त्याचबरोबर नडगाव गाव येथे शनिवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई ते खेड जाणारी वॅगनर कारचा पुढचा टायर फुटल्याने ती बाजूच्या डिव्हायडरवर आपटली. या अपघातात चालक महेश सुधाकर गुडे, प्रवासी रवींद्र देसाई दोन्ही राहणार मुंबई जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिस शाखा महाड यांनी घटनास्थळी दाखल झाले.