मोबाईल हॅक करून सहा लाख लंपास

| पनवेल | प्रतिनिधी |

मोबाईल फोनवर आलेली एक संशयास्पद एपीके फाईल डाऊनलोड करणे कामोठ्यातील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सायबरचोरांनी या फाईलच्या माध्यमातून तरुणाचा मोबाईल हॅक करून त्याच्या खात्यातून अवघ्या 50 मिनिटांत तब्बल 6 लाख 61 हजार रुपये लंपास केले आहेत.

या घटनेतील तक्रारदार अविनाश (34) आयात-निर्यात क्षेत्रात क्लिअरिंग एजंट म्हणून कार्यरत आहे. अविनाशच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरुन एपीके फाईल आली. ती फाईल त्याच्या मोबाईलमध्ये आपोआप डाऊनलोड झाली. एपीके फाईल डाऊनलोड होताच काही वेळातच अविनाश याला त्याच्या खात्यातून 1 लाख 99 हजार रुपये काढले गेल्याचा मेसेज आला. घाबरलेल्या अविनाश याने तत्काळ बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्याचा मोबाईल पूर्णपणे हॅक झाला होता. सायबरचोरांनी अविनाशचा मोबाईल हॅक करून अवघ्या 44 मिनिटांत 8 वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे त्याच्या खात्यातून एकूण 6 लाख 61 हजार रुपये लंपास केले.

Exit mobile version