साठ लाख टन साखर निर्यात होणार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
साठ लाख टन साखर 31 मे 2023 अखेपर्यंत निर्यात करण्याची परवानगी केंद्र सरकारने ठरावीक मर्यादेपर्यंत (कोटा तत्त्वावर) दिली आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने तशी अधिसूचना शनिवारी काढली. या साखर हंगामात कारखानानिहाय निर्यात मर्यादा सरकारने जाहीर केली. पुढील वर्षी मेअखेपर्यंत ही निर्यात करणे बंधनकारक असेल.

मंत्रालयाने गेल्या तीन वर्षांतील साखर हंगामातील साखर उत्पादन सरासरीच्या 18.23 टक्के समान निर्यात कोटा निश्‍चित केला आहे. साखर कारखाने स्वत: किंवा त्यांच्या निर्यातदारांमार्फत ही निर्यात करू शकतील. सरकारने 1 नोव्हेंबरपासून 31 मे 2023 पर्यंत वाजवी मर्यादेपर्यंत साखर निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी काळात देशांतर्गत साखर उत्पादनाच्या प्रमाणासाठी पुढील निर्यात मर्यादा निश्‍चित करण्यात येईल. 2022-23 या नव्या हंगामातील साखर उत्पादन महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. उत्तर प्रदेश आणि उर्वरित ऊस उत्पादक राज्यांत ते आठवडयाभरात सुरू होईल.

Exit mobile version