| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावरील सहा दुकाने रात्री चोरट्यांनी फोडली. या घटनेत किरकोळ वस्तूंची चोरी झाली असून दहशत माजवण्यासाठी या चोरीच्या घटना घडल्या असल्याचे बोलले जात आहे.
देऊलवाडी स्टॉपजवळील, डी-मार्ट समोरील एकूण पाच दुकाने आणि वांजले येथील हडप वडापाव असे एकूण सहा दुकाने चोरट्यांनी फोडलेली आहेत. शुक्रवारी तीन वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा जणांनी मोटार सायकलवरून येऊन शटर उखडून चोरी केली आहे. यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रांमधून, मैत्रीण ब्युटी पार्लरमधील, गादी कारखाना, केक शॉप तसेच वांजले येथील हडप वडापाव या दुकानांमधून रोख तर काही ठिकाणी किरकोळ ऐवज चोरीला गेला आहे.
दरम्यान, कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून कर्जत पोलीस ठाण्याच्यावतीने अधिक तपास सुरू आहे. अलीकडे सोनसाखळी चोरीची घटना ताजी असताना आणि दिवसेंदिवस वाढत्या चोरीचे प्रमाण लक्षात घेता कर्जत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.





