| हरियाणा | वृत्तसंस्था |
हरियाणामधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. हरियाणाच्या महेंद्रगड येथे एका स्कूल बसला भीषण अपघात झाला. यामध्ये सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. ईद-उल-फित्रची सुट्टी जाहीर करूनही शाळा का सुरू होत्या असा प्रश्नही आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना-दादरी रोडवर कनिबा शहराजवळ हा अपघात झाला. ही बस जीएल पब्लिक स्कूल या खासगी शाळेची होती. सुमारे 40 शाळकरी मुले या बसमध्ये होती. बस नियंत्रणाबाहेर जाऊन आधी झाडाला धडकली आणि नंतर उलटली. या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. घटनास्थळीच पाच मुलांचा मृत्यू झाला होता, तर एकाची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्या विद्यार्थ्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. तर 15 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे सरकारी सुट्टीच्या दिवशी शाळा भरवल्याने पालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघाताच्या वेळी बस चालकाने मद्यपान केले होते. अधिकृत कागदपत्रांनुसार बसचे फिटनेस प्रमाणपत्र सहा वर्षांपूर्वी 2018 मध्ये संपले होते.





