| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई शहरात स्वच्छता आणि कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबईकरांना ओला, सुका आणि घातक कचरा असे वर्गीकरण सक्तीचे केले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी ई-कचरा वर्गीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र यंदा गेल्या आठ महिन्यात 6 हजार किलोहून अधिक इलेक्ट्रॉनिक कचरा संकलित झाला आहे. कालांतराने ई-कचरा वर्गीकरणाला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर येत आहे.
घनकचरा व्यवस्थापनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवून महापालिकेने देशात उच्च स्थान प्राप्त केले आहे. इलेक्ट्रॉनिक कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या वतीने शहारतील 8 ही विभागात ई-कचर्यासाठी लाल रंगाच्या कुंड्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच रोटरी क्लब आणि ईकोटोपीया या खासगी संस्थांकडून इ-कचरा संकलित केला जात आहे. कचरावर्गीकरण, व्यवस्थापन यामध्ये पालिकेची सुव्यवस्थित नियोजन करून अंमलबजावणी सुरू आहे. ई-कचर्यामध्ये निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होतो.
यामध्ये संगणकाचे विविध सुटे भाग, बंद पडलेला मोबाईल, टीव्ही संच, जुन्या वाहनांचे सुटे भाग, मोबाईल चार्जर, सीडी, इत्यादी वस्तू वापराविना कचर्यात जातात. हा ई-कचरा नित्याच्या कचर्यात टाकल्यास पुढे त्याचे विघटन होत नसल्याने अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आधीच नागरिक स्तरावर याचे वर्गीकरण होण्यासाठी ई-कचरा संकलित केला जात आहे. शहरात जानेवारी ते ऑगस्टपर्यंत एकूण 6 हजार 124 किलो यामध्ये परिमंडळ 1 मधून 3 हजार 237 किलो तर परिमंडळ 2 मध्ये 2 हजार 887 किलो ई कचर्याचे संकलन करण्यात आलेले आहे.