भवितव्यासाठी कौशल्य विकास महत्वाचे: किशन जावळे

। अलिबाग । प्रतिनिधी ।

उद्योजकता विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून बंद्यांना चांगले वायरमन निर्माण होण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमातून रोजगार खुले करता येणार आहे. कारागृहातून बाहेर पडल्यावर समाजात वावरत असताना या प्रशिक्षणाचा बंद्यांना नक्कीच फायदा होणार आहे. तसेच, भवितव्य घडविण्यासाठी कौशल्य विकास महत्वाचे आहे, असे प्रतिपादन गुरुवारी (दि.19) रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित अलिबागमधील जिल्हा कारागृहातील बंद्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी लिड बँकेचे जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, जिल्हा कारागृह अधिक्षक अशोक कारकर, जिल्हा कौशल्य विकास केंद्रातील अधिकारी अमिता पवार, आयटीआयचे अमोल चव्हाण, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोद्याचे अधिकारी, आदर्श पतसंस्थेचे पदाधिकारी व अधिकारी, कारागृहातील कर्मचारी व बंदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, जिल्हा कारागृहातील सर्वच बंद्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे या भुमिकेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यूत जोडणी, दुरुस्तीचे प्रशिक्षण या उपक्रमातून बंद्याना मिळणार आहे. हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. प्रशिक्षणातून अनेक वायरमन तयार झाल्यास त्याचा फायदा नक्की होईल. या कौशल्य विकासातून मन रमण्याची संधी बंद्यांना प्राप्त होणार आहे. पंधरा दिवस हे प्रशिक्षण असणार आहे. जिल्हा उद्योग केंद्रासह महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व आयटीआयच्या अधिकार्‍यांनी यासाठी चांगले योगदान दिले आहे. घराघरात विद्यूत जोडणी व उपकरणे आहेत. विजेशिवाय कोणीच राहू शकत नाही. विद्यूत जोडणीसह उपकरणे बसविण्यासाठी तारतंत्रीला प्रचंड मागणी आहे. त्यांची प्रत्येकाला गरज आहे. बंद्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन चांगले शिक्षण घ्यावे, असे आवाहन जावळे यांनी केले आहे.

बंद्याना चांगले प्रशिक्षण मिळावे. त्यांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार बंद्यासाठी प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. कारागृहातील बंद्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांच्यामध्ये अमुलाग्र बदल निर्माण करण्याचा प्रयत्न कायमच कारागृहाच्या माध्यमातून होत असल्याचा आनंद आहे. ग्रंथालयासह वेगवेगळे खेळदेखील कारागृहात घेऊन बंद्याना घडविण्याचा व त्यांच्यामध्ये चांगले विचार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

– अशोक कारकर, जिल्हा कारागृह अधीक्षक

Exit mobile version