| अलिबाग | प्रतिनिधी ।
ग्रुप ग्रामपंचायत नागावच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी विविध कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फोर व्हीलर ड्रायव्हिंग, आरीवर्क आणि ज्वेलरी मेकिंग या तीन प्रशिक्षणांचा महिलांना पूर्णपणे मोफत लाभ घेता येणार आहे. फोर व्हीलर ड्रायव्हिंगचे 21 दिवसांचे प्रशिक्षण 20 महिलांसाठी आयोजित करण्यात आले असून, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक असलेले लर्निंग लायसन्स काढण्यासाठीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी आरटीओकडील संबंधित व्यक्ती 18 ऑगस्ट रोजी उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय आरीवर्कचे पाच दिवसांचे आणि ज्वेलरी मेकिंगचे पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सर्व प्रशिक्षणांसाठी आवश्यक साहित्य प्रशिक्षणार्थींना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणांसाठी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ग्रामपंचायत नागाव येथे नोंदणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गांना 19 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून, दररोज दुपारी 2 ते 6 या वेळेत वर्ग घेतले जाणार आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील जास्तीत जास्त महिलांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि 18 ऑगस्ट रोजी दिलेल्या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी केले आहे.
महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाची संधी
