नांदेड जिल्हाही शेकापमय होईल; चित्रलेखा पाटील यांचा दावा

| कंधार | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याप्रमाणेच नांदेड जिल्हाही शेकापमय होईल, असा दावा रायगड जिल्हा शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केला आहे.

कृषीवल परिवाराच्या माध्यमातून यावर्षी प्रथमच लोहा, कंधार येथे महिलांसाठी हळदीकुंकू सोहळा आयोजित करण्यात आला होता. कंधार येथे उपस्थित महिलांसमोर बोलताना चित्रलेखा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या शेतकरी कामगार पक्षाचे आजपर्यंत कायम वर्चस्व राहिलेले असून, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शामसुंदर शिंदे यांचे लोहा कंधार मतदार संघातील नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य हजारो महिला नागरिकांना व शेतकरी, कष्टकरी, वंचित उपेक्षितांना तळमळीने न्याय देण्याचे व त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे उल्लेखनीय कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.

कृषीवल हळदी कुंकू कार्यक्रमात एवढी मोठी महिलांची प्रचंड गर्दी पाहिल्याने मतदारसंघातील व जिल्ह्यातील हजारो लोक त्यांच्या पाठीशी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचेही त्यांनी केले. येणार्‍या काळात आशाताई शिंदे यांच्या माध्यमातून सर्व नांदेड जिल्ह्यावर आगामी काळात शेकापची एक हाती सत्ता राहील,असा विश्‍वास चित्रलेखा पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

महिलांची अलोट गर्दी
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून आशीर्वाद तुझा एकविरा आई फेम सिने अभिनेत्री मयुरी वाघ, जीवाची होतीया काहिली मालिका फेम श्रुतकिर्ती सावंत, गाथा नवनाथांची मालिका फेम जयेश शेवळकर, कृषीवल डिजिटल आवृत्ती संपादक माधवी सावंतसह प्रमुख पदाधिकारी व सिने कलाकार उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावरून बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की, हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजेच महिला भगिनींसाठी दिवस मानाचा सौभाग्याचा, सन्मानाचा व अस्मितेचा असतो. महिलांना समाजामध्ये वावरत असताना विविध क्षेत्रात महिलांना न्याय व मान सन्मान पाहिजे व मतदार संघातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी मी येणार्‍या काळात विविध बचत गट व विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमणीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित सिने कलाकार यांनी उपस्थित हजारो महिलांशी मनमोकळेपणे संवाद साधला, यावेळी आशाताई शिंदे व अभिनेत्री यांच्या हस्ते महिला भगिनींना हळदीकुंकू व वाणाचे करण्यात आले. कार्यक्रमास शहर व परिसरातील महिलांनी अलोट गर्दी केली होती. आशाताई शिंदे यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींचे स्वागत करून आभार मानले.

Exit mobile version