SKP@75! घराघरावर फडकू लागला लाल बावटा

नाक्यानाक्यावर बॅनरने वातावरण निर्मिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन 2 ऑगस्ट रोजी पेण तालुक्यातील वडखळ येथे मोठया उत्साहात साजरा केला जाणार आहे. अमृतमहोत्सवी वर्धापन दिन साजरा होत असल्याने शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठया उत्साहाचे वातावरण आहे. शेकाप नेत्यांच्या आढावा बैठकांमधून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत घराघरावर लाल बावटा फडकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील गावागावातील कार्यकर्त्यांच्या घरांवर लाल बावटा डौलाने फडकताना पहायला मिळत आहे. तसेच नाक्यानाक्यांवर वर्धापन दिनाला शुभेच्छा देणार्‍या बॅनरमुळे देखील वातावरण निर्मिती तयार झाली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाची जोरदार तयारी पक्षाच्यावतीने सुरु आहे. पेण तालुक्यातील वडखळ, येथे 2 ऑगस्टला होणार्‍या वर्धापनदिन सोहळ्यासाठी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेते,मंत्री गोपाळ राय, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी, शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी शेकाप चिटणीस मंडळाने प्रत्येक तालुक्यात आढावा बैठका घेत त्या बैठकांमधून वर्धापन दिनापूर्वी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या घरांवर लाल बावटा फडकवण्याचे तसेच नाक्यानाक्यावर वर्धापन दिनाला शुभेच्छा देणारे बॅनर लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना पहायला मिळत आहे.

28 जुलै पासूनच कार्यकर्त्यांनी आपल्या घरांवर लाल बावटा फडकवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावांमध्ये लाल बावटयाचे उत्साही वातावरण पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बॅनरबाजी देखील चांगलीच रंगत चालली आहे. या अमृतमहोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यास राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी अवश्य उपस्थित रहावे. तसेच 3 ऑगस्ट रोजी जिल्हा, तालुका, विभाग, गाव पातळीवर अमृतमहोत्सव साजरा करावा, असे आवाहन कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे यांनी केले आहे.

Exit mobile version