शेकापकडून जनतेच्या समस्या सोडविण्यात प्राधान्य

शेकाप नेते पंडित पाटील यांचे प्रतिपादन
| पेझारी | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यामध्ये विकासकामे ही शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाकाराने होत आहेत आणि होत असतात. सत्ता असो, वा नसो सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविणे याला आम्ही प्राधान्य देतो. शेतकरी कामगार पक्ष हा यशाने कधीही उन्मत्त झाला नाही आणि अपयशाने कधीही खचून गेला नाही. ज्याला काय बोलावे व काय बोलू नये हे कळते तो खरा वक्ता, ज्याला काय करावे आणि काय करू नये हे कळते तो खरा कार्यकर्ता या आप्पासाहेबांच्या ब्रीदवाक्याचा शेतकरी कामगार पक्ष आणि पाटील कुटुंबियांनी नेहमीच पाठपुरावा केला आहे, असे प्रतिपादन माजी आ. पंडित पाटील यांनी केले.

पोयनाड पशुवैद्यकीय दवाखाना नवी इमारत लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणामध्ये ते बोलत होते. जि.प.चे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती स्व. प्रमोद पाटील तथा पिंट्याशेठ यांच्या प्रयत्नांतून ही नवीन इमारत उभारण्यात आली आहे. तिचा लोकार्पण सोहळा आंबेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत हद्दीतील अपंग लाभार्थी तसेच कोरोना काळात विधवा झालेल्या स्त्रियांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप करणे, त्याचप्रमाणे आंबेपूर विभागातील गुणीजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच आंबेपूर पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारतीच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला.

यावेळी जि.प. माजी अध्यक्ष प्रकाश धुमाळ, जि.प. सदस्या चित्रा पाटील, सुश्रुता पाटील, अलिबाग पं.स. सभापती प्रमोद ठाकूर, माजी सभापती सुधीर थळे, सदस्य रचना म्हात्रे थोरे पाटील, प्रा. अनिल पाटील, पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रमुख डॉ. शामराव कदम, डॉ. स्मिता जिंतुरकर, डॉ. प्रिया काळे तसेच आंबेपूर सरपंच सुमन पाटील, युवा नेते सवाई पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच ममता पाटील, विजय पाटील, महेंद्र पाटील, मेघा पाटील, तसेच सर्व आजी-माजी सदस्य, कर्मचारीवर्ग, पोयनाड विभागातील ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात झेप फाऊंडेशनच्या कार्याध्यक्षा चित्रा पाटील यांनी या पशुवैद्यकीय दवाखान्यामुळे पशुसंगोपन हा जोडव्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांना त्याचा चांगलाच लाभ होणार आहे. त्यामुळे या वास्तू बांधकामाशी संबंधित ज्या ज्या व्यक्ती आहेत, त्या सर्वांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर युवा नेते सवाई पाटील यांनीही आपल्या आजोबांची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही पाटील कुटुंबीय नेहमीच कटिबद्ध असतो आणि कटिबद्ध राहणार, अशी ग्वाही आपल्या मनोगतातून दिली.

सरपंच सुमन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत हद्दीतील 17 अपंग लाभार्थी तसेच कोरोना काळात विधवा झालेल्या स्त्रियांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप, त्याचप्रमाणे आंबेपूर विभागातील गुणीजन रायगड भूषण पुरस्कार प्राप्त परशुराम पाटील व राजन पांचाळ आणि गुणवंत विद्यार्थिनी मानसी म्हात्रे, पूर्वा पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले.

Exit mobile version