अलिबाग स्थानकातील स्लॅब कोसळला


|रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।


अलिबाग एसटी बस स्थानकातील प्रवासी प्रतीक्षा कक्ष आरक्षण कक्ष आणि कॅन्टीन जवळील स्लॅब शुक्रवारी दि.७ सायंकाळी कोसळला. सुदैवाने जिवीतहानी टळली. या घटनेने स्थानकातील इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


अलिबाग बस स्थानक एक एप्रिल 1961 मध्ये बांधण्यात आले. 64 वर्ष जुने असलेल्या स्थानकाच्या जागी नवीन इमारत बांधण्याची हालचाल सहा वर्षांपूर्वी झाली होती. 28 ऑगस्ट 2019 मध्ये कामाचे भूमिपूजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. सात हजार 630 चौ. फुट इतक्या क्षेत्रात बस स्थानक बांधले जाणार होते. तळमजला, पहिला मजला अशा पद्धतीने स्थानकात इमारत निर्माण होणार होती. एक लाख प्रवासी ये -जा करतील इतक्या क्षमतेचे स्थानक होणार होते. त्यामध्ये चालक वाहकांसाठी विश्रांती कक्ष, आरक्षण कक्ष , हिरकणी कक्ष, 14 फलाट आणि प्रतीक्षालय बांधले जाणार होते. मात्र भूमिपूजन होऊन सहा वर्ष होत आली तरी देखील साधी एक वीट देखील उभारण्यात आली नसल्याचे दिसून आले.त्यामुळे अलिबाग स्थानकाचा कारभार जुन्याच इमारतीमध्ये सुरू आहे.


जुन्या इमारतीच्या अवस्था जिर्ण झाले असून वारंवार कोसळण्याचे संकट कायमच आहे .पावसाळ्यात गळती लागण्याचे प्रकार घडत असतात. या जुन्या इमारतीमध्ये आरक्षण कक्ष, पार्सल कक्ष, विद्यार्थी पास कक्ष , प्रवासी प्रतीक्षालय , अलिबाग पनवेल विना थांबा नियंत्रण कक्ष आणि उपहारगृह आहे. शुक्रवारी सायंकाळी याच उपहारगृहाच्या बाहेर भागात भागातील स्लॅब अचानक कोसळला. हा भाग कायमच वर्दळीचा असतो.सुदैवाने स्लॅब कोसळला त्यावेळी कोणीही त्या ठिकाणी नव्हते. त्यामुळे मोठी जीवित हानी तळली असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

अलिबाग एसटी बस स्थानकाचा कारभार जुन्याच इमारतीमध्ये चालत असल्याने प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचे सुरक्षा वाऱ्यावर असलेले चित्र शुक्रवारी घडलेल्या घटनेनुसार दिसून येत आहे.त्यामुळे तात्काळ नवीन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Exit mobile version