बळीवरे येथे झाडांची कत्तल

गावठाण जमिनीवर लाकडांचा ढीग

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बळीवरे गावाच्या शिवारात जंगलतोड झाली आहे. त्या भागात दोन ठिकाणी तोडलेल्या झाडांची साठवणूक करण्यात आली असून, ती झाडे नक्की कुठे तोडली आहेत? याबद्दल कोणतीही माहिती नसल्याने बळीवरे आणि खांडस भागातील जंगलतोडबद्दल संशय व्यक्त होत आहे.

कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या बळीवरे गावाच्या शिवारात जंगलात तोडलेल्या झाडांची साठवणूक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली होती. प्रत्यक्ष नांदगाव ते बळीवरे या रस्त्यावर आणि बळीवरे ते ऐनाचीवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाडे तोडून ठेवली असल्याचे आढळून आले आहे. बळीवरे गावाच्या बाहेर तर चक्क गावठाण जागेत या लाकडांची साठवणूक करण्यात आला आहे. त्यामुळे ती लाकडे गावठाण जमिनीतील जंगलतोडमधील आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. साधारण ज्या भागातील जमिनीमधील झाडे तोडली जातात. त्याच ठिकाणी लाकडांची साठवणूक केली जाते. मात्र, बळीवरे गावाच्या गावठाण क्षेत्रात जंगलतोड करुन ठेवलेली लाकडे आणून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे ती लाकडे बळीवरे परिसरातील गावठाण जमिनी मधील झाडांवर कुऱ्हाड फिरवून त्या झाडांची कत्तल केली असल्याचा संशय स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.


कर्जत तालुक्यात यावर्षी सर्वाधिक प्रमाणात जंगलतोड झाली असून, बळीवरे हे गाव तालुक्याच्या मुख्यालयापासून किमान 30 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे अधिकारीदेखील अशा भागाकडे साधारणपणे फिरकत नाहीत आणि त्याचा फायदा जंगलतोड करणारे ठेकेदार उचलतात. त्यामुळे बळीवरे गावाच्या बाहेर साठवून ठेवलेली लाकडे नक्की कोणत्या जंगलात तोडून आणली आहेत, याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही. कारण, बळीवरे गावाच्या मागे भीमाशंकर अभयारण्य परिसर असून, त्या भागातील जंगल हे राखीव वन म्हणून जाहीर आहे. मग कोणत्या जंगलातील झाडे तोडून आणली आहेत, असा प्रश्न वन विभागाने उपस्थित करण्याची गरज आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल अस्तित्वात राहिले नसल्याने संबंधित ठेकेदाराने तोडून आणलेली लाकडे ही राखीव वन क्षेत्रातील तर नाहीत ना, असा संशयदेखील व्यक्त होत आहे. भीमाशंकर अभयारण्यालगत झाडे तोडण्यास सक्त मनाई असल्याने बळीवरे येथे तोडून ठेवलेली लाकडे ही अभयारण्य परिसरातील असल्यास कायदेशीर कारवाई संबंधित ठेकेदारावर होऊ शकते. त्याची खात्री वन विभाग करणार आहे काय, असा सवाल स्थानिक शेतकरी करीत असून, वनजमिनीवरील किंवा खासगी जमिनीवरील झाडांची तोड करण्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी बळीवरे येथील जंगलतोडवरून सुरू झाली आहे.

बळीवरे येथील एक शेतकरी आणि खांडस येथील एका शेतकऱ्याने आपल्या जमिनीतील झाडे तोडण्याची परवानगी आमच्या खात्याकडून घेतली आहे. त्यानुसार परवानगी देण्यात आली असून, तोडलेल्या झाडांची साठवणूक कोणत्या जमिनीवर केली आहे याचे कोणतेही पासेस आम्ही अद्याप दिले नाहीत.

गणेश दिघे, वनपाल, खांडस
Exit mobile version