। पनवेल । वार्ताहर ।
खारघर सेक्टर 35 ई मध्ये रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडांची अज्ञातांकडून कत्तल करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार विज्ञान-तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभागाचे जिल्हा अध्यक्ष मुसादीफ मोडक यांनी पालिका अधिकार्यांकडे केली आहे.
पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने प्रशासकीय पातळीवर विविध उपाय केले जात आहेत. राज्य शासनातर्फे झाडे लावण्याच्या मोहिमा राबवण्यात येत आहेत. असे असताना सेक्टर 35 ई, प्रोव्हिसो कॉम्प्लेक्स सोसायटीसमोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या चार ते पाच मोठ्या झाडांची अज्ञातांकडून कत्तल करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन पालिका आणि सिडकोने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने ग्राहकांना दिसावीत, म्हणून ही झाडे तोडण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
खारघर सेक्टर 35 मधील पदपथावरील झाडांची छाटणी केली आहे. कोणतेही झाड तोडण्यापूर्वी पालिकेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी नसताना झाडे तोडली असतील, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
कैलास गावडे
उपायुक्त, पनवेल महापालिका