रत्नागिरी जिल्ह्यात एसटी बंदचा नारा कायम

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
राज्य परिवहन महामंडळातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदाचे पडसाद राज्यव्यापी असून, रत्नागिरी जिल्ह्यात अद्यापही बंद कायम असल्याचे चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे, असा अध्यादेश आला पाहिजे, याकरिता कर्मचारी अडून बसले आहेत.
एसटी कर्मचारी काम बंद आंदोलनावर ठाम राहिल्यामुळे एकही फेरी सुटू शकली नाही. रत्नागिरी जिल्ह्यात लांब पल्ला, शहरी वाहतुकीसह ग्रामीण फेर्‍याही थांबल्या आहेत. त्यात प्रथमच विभागीय कार्यशाळा आणि टीआरपी येथील कारागिरांनीही बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. त्यामुळे दिवसभरात एकही गाडी दुरुस्त करण्यात आली नाही.
रत्नागिरी आगाराच्या सर्व गाड्या माळनाका येथील एसटी आगारात लावून ठेवल्या होत्या. एसटीचे प्रशासनही बंदमध्ये सहभागी झाल्याने एकंदरीतच कामकाज ठप्प झाल्याची स्थिती होती. यामुळे बंदाला शंभर टक्के प्रतिसाद प्राप्त झाला आहे.
बंदची कल्पना असल्याने प्रवाशांनी रहाटागर आणि मध्यवर्ती बस स्थानकाकडे पाठ फिरवली. त्यामुळे येथे शुकशुकाट होता. ज्या प्रवाशांनाही माहितीच नव्हती, असे काही प्रवासी बस स्थानकात पाहायला मिळाले, परंतु सुरक्षारक्षकांनी त्यांनी मिळेल, त्या खासगी वाहनाने प्रवास करण्याचा सल्ला दिला. कामावर जाणार्‍या प्रवाशांची आज दाणादाण उडाली. नेहमी ग्रामीण, दुर्गम भागातून शहराच्या व तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी येणार्‍या कामगारांना पर्यायी व्यवस्था करून कामावर यावे लागले. काहींना चक्क कामावर दांडी मारावी लागली.

Exit mobile version