अवघे 50 टक्केच काम पुर्ण
। अलिबाग । भारत रांजणकर ।
अलिबाग परिसरात विद्यूत वाहिन्या भुमिगत करण्याचे सुरु असलेले काम अतिशय संथ गतीने सुरु असून आतापर्यंत अवघे 50 टक्केच काम पुर्ण झाले असल्याने प्रत्यक्षात पुर्णत्वास कधी जाईल याबाबत संभ्रमच आहे. जवळपास 89 कोटींच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असून आपत्ती धोके निवारण कार्यक्रमातून राबवण्यात येणारा हा राज्यातील दुसरा प्रकल्प ठरणार आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या दोन वर्षात 50 टक्केच काम पुर्ण होऊ शकल्याने उर्वरित 50 टक्के काम पाच महिन्यात होण्याची शक्यता धुसरच आहे.
जागतिक बँक, केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोकेनिवारण प्रकल्प अंतर्गत अलिबाग शहर व संलग्न गावांत भूमिगत विद्युत प्रणाली प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अलिबाग शहर तसेच संलग्नित चेंढरे व वरसोली ग्रामपंचायतीचा काही भागात भुमिगत विद्युत प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 89 कोटी रुपये इतका खर्च होणार आहे. या प्रकल्पामुळे चक्रीवादळ व अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी उपरी तारमार्ग (ओव्हरहेड वायर) तुटून, पोल कोसळून अनेक प्रकारे नुकसान व जीवित हानी होत असते. शिवाय विद्युत पुरवठा खंडित होऊन जनजीवनावर परिणामही होत असतो. हे टाळण्यासाठी भुमिगत विद्युत प्रणाली तयार करुन सशक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
प्रकल्पासाठी कंत्राटदार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. 18 महिन्यात हे काम पुर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे हे काम रखडले होते. मात्र आता या कामाला गती मिळाली असून जवळपास 50 टक्के काम पुर्णही झाले आहे. उर्वरीत काम सप्टेंबर 22 अखेर पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र आतापर्यंतची कामाची गती पाहता सप्टेंबर अखेरपर्यंत हे काम होण्याची शक्यता दिसत नाही. त्यात पाऊस सुरु झाल्यानंतर पुन्हा कामात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंतचे काम करताना अनेक ठिकाणच्या रस्त्यांची वाट लागली आहे. त्याची दुरुस्ती देखील करण्यात आली नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
अलिबाग शहर, चेंढरे ग्रामपंचायत व वरसोली ग्रामपंचायतीचा काही भाग येथे हे भुमिगत केबलिंग केले जाणार आहे. तसेच अलिबाग शहरातील 22/22 के.व्ही. अलिबाग स्विचिंग स्टेशनचेही नुतनीकरण होणार आहे. या प्रकल्पात एकूण 27 कि.मी. लांबीची उच्चदाब वाहिनी व 45 कि.मी. लांबीची लघुदाब वाहिनी भुमिगत टाकली जाणार आहे. 7.9 चौ.कि.मी. परिसरात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यात एकूण 118 रोहित्र, 78 आरएमयु, यांचाही समावेश आहे. भुमिगत केबल टाकण्यासाठी ट्रॅचिंग व ट्रॅच लेस जमिनीत आडवे ड्रिलिंग करणे या पद्धतीचा वापर होईल. केबल साठी जमिनीखाली 0.8 ते 1.2 मि. खोल खड्डा असेल तर रोहित्र जमिनीपासून 1.5 मिटरवर असतील. प्रकल्पासाठी 89 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
शहरातील विद्युत वाहिन्या भुमिगत करण्याचे काम सुरु झाले आहे. चेंढरे, वरसोली क्षेत्रातील कामे जवळपास पुर्ण झाली आहेत. शहरातील उर्वरीत कामे ही प्रगतीपथावर आहेत. ही सर्व कामे सप्टेंबर 22 अखेर पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित आहे. यामुळे पावसाळ्यात विज पुरवठा खंडीत होण्याचा प्रश्न यामुळे निकाली निघेल. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. -कुंदन भिसे, कार्यकारी अभियंता, महावितरण अलिबाग







