अनधिकृत बांधकामांवर आता स्मार्ट वॉचची नजर

| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महापालिकेची प्रभाग कार्यालय सक्षम झाल्या़स तेथील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविल्या जातील, त्यांना चांगल्या सोयी सुविधा देता येतील. यासाठी येत्या तीन वर्षात प्रशस्त प्रभाग समिती कार्यालये बांधण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना अधिकारी आणि प्रभाग अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी नुकत्याच दिल्या.

प्रभाग कार्यालये ही लहान नगरपालिकाच असते, प्रत्येक कामासाठी नागरिकांना मुख्यालयात न येता त्यांची कामे प्रभाग कार्यालयातच व्हावी यासाठी प्रभाग कार्यालये सुसज्ज हवी. सर्व सोयी- सुविधांनीयुक्त अशी प्रभाग कार्यालये बांधण्याच्या दृष्टीने त्यांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिल्या.

याचबरोबर अतिक्रमणाविरोधात येथून पुढे कठोर पावले उचलली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. अनधिकृत झोपड्या ,अनधिकृत बॅनर, होर्डिंग, रस्त्यांवरील फळविक्रते, फूटपाथवरील विक्रेते यांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश प्रभाग अधिकार्‍यांना दिले.
पनवेल पालिका स्थापन झाल्यापासून जी अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत झोपड्या बांधल्या गेल्या आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे नियोजन लवकरात लवकर करावे असे आदेश यावेळी आयुक्तांनी प्रभाग अधिकार्‍यांना दिले.

पनवेल कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये अनधिकृत बांधकामे सहज कळावी यासाठी ङ्गस्मार्ट वॉचफ यंत्रणा राबविण्यात येणार आहे. याचे प्रात्यक्षिक या बैठकित दाखविण्यात आले. या यंत्रणेद्वारे अनधिकृतपणे केलेली बांधकामे मुख्यालयात बसून देखील पहाता येणे शक्य होणार आहे. येत्या काही दिवसात ही यंत्रणा महापालिका राबविणार आहे.

लॉकडाऊन चे नियम पायदळी तुडवून परवानगी नसताना देखील जी हॉटेल्स उशीरा पर्यंत सुरु ठेवली जात आहे अशा हॉटेल्सवर सक्त कारवाई करण्याचे आदेश यावेळी अधिकारी आणि प्रभाग अधिकारी यांना आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले. तसेच रोज चार नंतर अत्यावश्यक सेवेशिवाय जी दुकाने उघडी राहतील त्यांच्यावरतीही कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. या बैठकीस उपायुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, चार प्रभागाचे प्रभाग अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version