| अलिबाग | वार्ताहर |
ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागच्या स्मार्टफोन न वापरणार्या सभासदांसाठी पुण्याच्या आंतरराष्ट्रीय दीर्घायु केंद्रामार्फत दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण जेष्ठ नागरिक संस्थेच्या ल.नी. नातू सभागृहात (दि.10) जून व (दि.11) जून रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते.
नामवंत शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर अध्यक्ष असलेल्या या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मार्फत हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला होता. त्यांत संस्थेच्या 35 सभासदांनी भाग घेतला होता. दीर्घायु संस्थेमार्फत सुशांत सोनवणे हे अधिकारी व नंदकुमार सकट, यशोदा पाध्ये यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले. या प्रशिक्षण वर्गांत व्हाट्सअपचा वापर, स्मार्टफोनमधील सुविधा, अत्यावश्यक असलेले ऍप्स, फोन वापरताना घ्यावयाची काळजी, फोनची बॅटरी दीर्घकाळ टिकावी म्हणून घ्यावयाची दक्षता, फोन हरविल्यास प्रथम काय करावे याचे मार्गदर्शन, ई-मेलचा वापर कसा करावा, आर्थिक व्यवहार करताना कसे सावध राहावे, आदी मार्गदर्शन प्रशिक्षकांमार्फत सविस्तर करण्यात आले. दीर्घायु ही संस्था सोळा देशात सामाजिक कार्य करीत असून त्या ठिकाणी संस्थेची कार्यालये आहेत. ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण वर्गाच्या शेवटच्या सत्रात पालकर यांनी समक्ष उपस्थित राहून सभासदांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राऊत यांनी सुरश पालकर यांचे व दीर्घायु केंद्राच्या प्रशिक्षकांचे आभार मानून प्रशिक्षणाची सांगता केली.
ज्येष्ठ नागरिक संस्थेमार्फत अलिबागच्या ज्येष्ठांना स्मार्टफोन प्रशिक्षण
