। चणेरा । वार्ताहर।
मुरुड-महाड गाडी तळेखारनजीक आल्यानंतर अचानक धूर निघाल्याने प्रवासी वर्ग भयभीत झाला होता. वाहनचालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबविल्याने सर्व प्रवासी सुखरूपपणे खाली उतरले. या आठवड्याभरात मुरुड आगाराच्या तीन गाड्यांमध्ये रस्त्यामध्ये बिघाड होऊन बंद पडल्याने प्रवासी वर्गांचे मोठे हाल झाले आहेत. त्यामुळे आता मुरुड आगाराला घरघर लागली की काय अशी शंका निर्माण होत आहे. रस्त्यात गाड्या बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
15 ऑक्टोबर रोजी मुरुड-स्वारगेट गाडी रेवदंडा परिसरात मागील टायर पंक्चर झाल्याने वाहनचालकाने कशीबशी गाडी अलिबाग आगारापर्यंत पोहोचवली होती. 17 ऑक्टोबर रोजी मुरुड-बोरीवली गाडी बोर्ली मांडला येथे पंक्चर झाल्याने प्रवाशांना तेथेच उतरावे लागले होते. सदर दोन्ही पंक्चर गाड्यांमध्ये स्टेपनी नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. या दोन्ही घटना ताज्या असताना मुरुड महाड गाडी सकाळी निघाली. ही गाडी सीएनजी होती. ती गाडी चोरढे-सावरोली सोडल्यानंतर तळेखारनजीक येताच अचानक या गाडीतून धूर येऊ लागला. गाडीमध्ये सर्वत्र धूर झाल्याने प्रवासी घाबरले. चालकाने तात्काळ गाडी बाजूला थांबवली त्यानंतर सर्व प्रवासी खाली उतरले कोणालाही दुखापत झाली नाही. महिन्याभरापूर्वी रेवदंडा परिसरात अशाच मुरुड सीएनजी गाडीत बिघाड झाला होता. या गाडीतून धूर निघाला होता. सदर सीएनजी गाड्यांचे मेकॅनिक अलिबाग मुरुड व रोहा आगारात उपलब्ध नसल्याने दुरुस्तीसाठी अडचण येत आहे. प्रवाशांनी किती त्रास सहन करायचा जर सीएनजी गाडी दिली तर त्यांचे मेकॅनिकसुद्धा द्यावेत व गाड्या पूर्णपणे तपासल्याशिवाय सोडू नये, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.