शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा
दंगल नियंत्रण पथक तैनात
। सिंधुदुर्ग। वृत्तसंस्था ।
कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. नगरपंचायतीच्या आवारात वाहने नेण्यास मनाई असतानाही शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी गाडी आत घुसवल्याने त्याला भाजप कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमकी उडाल्या.
दरम्यान, कुडाळच्या नगराध्यपदी काँग्रेसच्या आफ्रिन करोल या विजयी झाल्या आहेत. त्यांना 9 मते मिळाली तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकरांना 8 मते मिळाली आहेत. त्यामुळे नारायण राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्याने नगरपंचायतीबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पंचायतीच्या परिसरात वाहने आणण्यास मनाई करण्यात आली होती. भाजपचे कार्यकर्तेही गाडीने पंचायतीच्या आवारात येत असताना त्यांना लांबच रोखण्यात आलं होतं. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना त्यांची वाहने निषिद्ध क्षेत्राच्या बाहेर ठेवाव्या लागल्या होत्या. मात्र, शिवसेना आमदार वैभव नाईक हे घटनास्थळी आले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवकही होते. त्यांच्या दोन गाड्या नगरपंचायतीच्या आवारात आल्याने त्याला भाजपने जोरदार आक्षेप घेतला. आमच्या गाड्या रोखल्या मग शिवसेनेच्या का रोखत नाही? असा सवाल भाजपने केला. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही गटाकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. शेकडो कार्यकर्ते एकाच ठिकाणी जमल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही बाजूला कार्यकर्ते जमले
जमावाला पांगवण्यात यंत्रणा कमी पडत असल्याने पोलिसांनी तात्काळ दंगल नियंत्रण पथकाला घटनास्थळी पाचारण केलं. यावेळी डीवायएसपी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, पोलीस कुमक आल्यानंतरही या परिसरात तणावाची स्थिती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उभे होते. त्यानंतर निवडणुकीचा निकाल काँग्रेसच्या बाजूने येताच शिवसैनिक, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात एकच जल्लोष केला. त्यामुळे पोलीस पुन्हा एकदा अॅलर्ट झाले होते.