गॅस दरवाढीने उज्ज्वलाच्या डोळ्यात धूर ; हाती पुन्हा फुंकणी

अलिबाग | भारत रांजणकर |
दिवसेंदिवस होणार्‍या गॅस दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना उज्जवला च्या लाभार्थ्यांच्या डोळ्यात धूर व हाती फुंकणी आली आहे.
केंद्र शासनाने चुलीवर जेवण बनविणार्‍या गोरगरीब महिलांना चुलीच्या धुराच्या पासून व फाट्यापासून मुक्ती देण्याकरता महत्वाकांक्षी योजना उज्ज्वला 2016 मध्ये लागू केली. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने गोरगरिबांना मोफत गॅस कनेक्शन दिले. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ चुलीच्या धुराचा सामना करणार्या गरीब परिवारातील महिलांना थोडा आधार मिळाला खरा पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. कारण गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने दरवाढ होत असल्याने सरकारच्या उज्ज्वला योजनेला हरताळ फासला गेला आहे. परिणामी महाग गॅस सिलिंडर विकत घेण्याची ऐपत नसलेल्या गोरगरीब परिवारातील महिलांना लाकूड वा कोळशाच्या चुलीवर स्वयंपाक करून धुराचा सामना करावा लागत आहे.
75 टक्के उज्जवलांनी फिरवली पाठ*
16 ऑगस्ट 2021व 1 सप्टेंबर 2021 या 15 दिवसांच्या काळात कालावधीत घरगुती गॅस सिलेंडर मध्ये 2 वेळा 16 ऑगस्टला 25 व 1 सप्टेंबर 2021 25 रुपयांची वाढ झाली. म्हणजे पंधरा दिवसात 50 रुपयांची वाढ होऊन सदरचा सिलेंडर 889 रुपये 50 पैसे म्हणजे सुमारे 900 रुपयांच्या घरात गेला. त्यामुळे ज्या गोरगरीबांना सिलेंडरचे डिपॉझिट भरणे शक्य नव्हते अशा गोरगरिबांना उज्ज्वाला योजना म्हणून केंद्र शासनाने गॅस उपलब्ध करून दिला होता. परंतु गॅसच्या दिवसेंदिवस अफाट वाढलेल्या किमतीमुळे उज्ज्वाला योजनेअंतर्गत घेतलेल्या सिलेंडरचे रिफील करणे कठीण झाल्याने पेण तालुक्यातील सुमारे 75% उज्जवला गॅस धारकांनी महागड्या सिलेंडर कडे पाठ फिरवली आहे. पेण तालुक्यात सुमारे 5000 ते 5500 उज्जवला गॅस योजनेचे लाभार्थी असून त्यापैकी केवळ 25 टक्केच लाभार्थी महागड्या गॅसचा वापर करीत आहेत. देशभरात उज्जवला गॅस योजने अंतर्गत सुमारे 8 कोटी गोरगरिबांना सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात आले होते. यापैकी सुमारे 25 ते 30 टक्के सिलेंडरच पुन्हा रिफिल होत आहेत.

सामान्यांचेही कंबरडे मोडले
भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या मार्फत घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात होतो. पेण तालुक्यात सुमारे 50 हजार गॅस सिलेंडर धारक आहेत. एका गॅस कनेक्शनला एका महिन्याला 1 सिलेंडर यानुसार बारा महिन्यांना 12 सिलेडर घेता येतात. परंतु गॅस दरवाढीमुळे 12 च्या ऐवजी सरासरी सुमारे 7 ते 8 सिलेंडरच सर्वसामान्य गॅस कनेक्शन धारक घेत असल्याची माहिती वरदान गॅस एजन्सीचे मालक उदय मनोरे यांनी दिली. थोडक्यात गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

अनुदान मिळालेच नाही
पूर्वी गॅस सिलेंडर अनुदानित रक्कम वजा करून उर्वरित रक्कमे मधेच मिळत होते. त्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव कमी होते. त्यानंतर केंद्र शासनाने धोरण बदलून गॅस ग्राहकांकडून पूर्ण रक्कम घेऊन अनुदानाची रक्कम खात्यात जमा करण्याची पद्धत सुरू केली. तरीही गॅसग्राहकांना खात्यात का होईना पण अनुदान मिळत होते. परंतु 1एप्रिल 2020 पासून अनुदानाची रक्कम कोणत्याही ग्राहकांना मिळालीच नाही.

तरीही उज्जवला 2 योजनेचा घाट
उज्जवला योजने अंतर्गत दिलेल्या गॅसधारकांनी गॅस सिलेंडर कडे पाठ फिरवली असताना देखील केंद्र शासनाने मात्र उज्जवला 2 योजनेचा घाट घातला आहे. या योजनेअंतर्गत पुन्हा एकदा गोरगरिबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे परंतु त्यानंतरच्या गॅस सिलेंडर रिफिल करताना मात्र गॅसच्या महागड्या किमतीमुळे गोरगरिबांचे कंबरडे मोडणार हे मात्र निश्‍चित. राज्यातील अनेक गरीब उज्ज्वलांवर चुल फुंकण्याची वेळ आणली आहे, सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे गोरगरीब महिलांना फुंकणी हातात धरून दुखाश्रू गाळण्याची वेळ आली आहे.

Exit mobile version