नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
। तळा । वार्ताहर ।
तळा परिसरात धूमस्टाईल मोटारसायकल चालविण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून, यामध्ये तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. हे तरुण मोटारसायकल स्वार भरधाव वेगाने, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत, वेड्यावाकड्या पद्धतीने त्यांच्या ताब्यातील दुचाकी चालवित असल्यामुळे परिसरात अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रोहा, तळा, महाड येथे असणार्या विविध शिक्षण संस्था तसेच कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणाईला उपलब्ध होणारे रोजगार आणि अन्य कारणांमुळे या परिसरातून तरुणाईची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते. मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली टाळेबंदी आणि त्यानंतर आलेला राज्यपरिवहन महामंडळाच्या कर्मचार्याचे कामबंद आंदोलन यामुळे मिनीडोर किंवा स्वतःच्या मालकीची वाहने यापलिकडे प्रवासासाठी अन्य कोणताच पर्याय स्थानिक क्षेत्रात उपलब्ध नाही.
वर्दळीच्या ठिकाणी आसपासच्या परिसरातील तरुण त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल धूमस्टाईलने चालवित असतात. नाहक कर्णकर्कश हॉन वाजविणे, वेडेवाकड्या पद्धतीने दुचाकी चालविणे, उगाच रेस करणे किंवा भरधाव वेगात वाहनांचे स्टंट मारणे असे विविध प्रकार या तरुण वाहनचालकांकडून करण्यात येतात. यामध्ये नोंदविण्यासारखी बाब म्हणजे अशी की, यातील बहुतांश वाहनचालक हे 18 वर्षाखालील वयोगटातील आहेत. यामुळे या परिसरातून प्रवास करणारे स्थानिक तथा अन्य नागरिक यांच्यामध्ये या प्रकारांबाबत भीती निर्माण झाली आहे.पोलीस निरीक्षकांनी या प्रकाराची दखल घेत, भविष्यातील संभाव्य अपघात वा संबंधित प्रकार टाळण्यासाठी बेदरकारपणे वाहन चालवणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.