आत्करगाव ग्रामस्थांच्या लढ्याला यश
| खोपोली | प्रतिनिधी |
जैविक कचर्याची विल्हेवाट लावणारा एसएमएस हा कारखाना गोवंडी येथून आत्करगाव येथे येणार होता. या कारखान्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी कारखान्याला तीव्र विरोध केला होता. अखेर हा कारखाना आत्करगाव येथे न आणता अन्य ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गेली दीड वर्ष कारखान्याविरोधात सुरू असलेल्या लढ्याला यश आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत आनंदोत्सव साजरा केला आहे.
खालापूर तालुक्यातील आत्करगाव येथे एसएमएस हा कारखाना येणार होता. जैविक कचर्याची विल्हेवाट या कारखान्यात लावली जाणार असल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार होता. त्यामुळे स्थानिकांनी या कारखान्याला तीव्र विरोध केला होता. जनसुनावणीत ग्रामस्थ आक्रमक झाले होते. आ. महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे कारखाना होऊ नये यासाठी विनंती केली होती. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आ. महेंद्र थोरवे, कंपनीचे संचालक, विविध खात्यांचे अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक बुधवार, दि.30 नोव्हेंबर रोजी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आत्करगावचे मा. उपसरपंच संदीप पाटील, शिवसेना शिंदे गट युवासेनाधिकारी रोहित विचारे, ग्रामस्थ हेमंत पाटील, नितेश पाटील, विनोद भोईर, शिवाजी पाटील, चंद्रकांत देशमुख, ग्रा.पं. सदस्य समीर देशमुख, मनोहर शिंदे, गणेश पाटील, विलास मते, अमोल देशमुख, भरत झुंजारराव, संतोष पाटील उपस्थित होते.
एसएमएस एनव्हॉक्लीन प्रा.लि. आत्करगाव येथील गट क्रमांक 231 येथे बायो मेडिकल वेस्ट म्हणजेच मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या हॉस्पिटलमधून येणारा कचरा येथे प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे काम करणार होते. परंतु, ही कंपनी खूप हानिकारक असून, त्यामुळे परिसरातील लोकांच्या व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यासंदर्भात एमपीसीबीकने त्याबाबत 13 ऑगस्ट 2021 रोजी जनसुनावणी लावली होती. स्थानिक ग्रामस्थ आत्करगाव तसेच पूर्ण पंचक्रोशीतील तथा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्या जनसुनावणीला प्रचंड विरोध केला. स्थानिक आ. थोरवे यांनीही जनसुनावणीच बेकायदेशीर असल्याचे सांगत विरोध दर्शवत तसे पत्र सुनावणीत सादर केले होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत आयोजित बैठकीत ग्रामस्थांची बाजू भक्कम मांडली असता ग्रामस्थांच्या तीव्र भावनांचा आदर करत हा कारखाना अन्यत्र हलवावा, शासन सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासित केले. त्यामुळे ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश आले असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. सोमवारी रात्री उशिरा ग्रामस्थांनी प्रस्तावित कंपनीच्या गेटसमोर जमून आनंदोत्सव साजरा केला.
या कारखान्याविरोधात आ. जयंत पाटील यांनी वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठविला होता. त्याचबरोबर आ. महेंद्र थोरवे, माजी आ. सुरेश लाड, जि.प. सदस्य नरेश पाटील यांच्यासह पत्रकारांनी आवाज उठवून सहकार्य केले आहे. हा कारखाना अन्यत्र हलविण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्याबद्दल सर्वांचे आभार.
संदीप पाटील,
तालुका चिटणीस शेकाप