तीन कोटींची फटाक्यांची तस्करी उघड

दहा हजार किलो फटाके जप्त, मुख्य सूत्रधार अटकेत

| उरण | प्रतिनिधी |

जेएनपीए बंदरातून प्रतिबंधित मालाची तस्करी करण्याचा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उधळून लावला. परदेशातून आलेल्या जहाजावरील कंटेनरमध्ये बाटल्या आणि वॉलपेपर असल्याचे कागदोपत्री दाखवून त्याच्या आडून तब्बल 10 हजार किलो फटाके लपवून आणण्यात आले होते. डीआरआयच्या पथकाने छापा टाकून सुमारे 3 कोटी रुपये किमतीचा माल जप्त केला. या कारवाईने बंदर परिसरातील तस्करीच्या कारवायांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे डीआरआयने संशयित कंटेनरची झाडाझडती घेतली. कंटेनरच्या सुरुवातीच्या फक्त तीन रांगांमध्ये बाटल्या आणि वॉलपेपरचा घोषित माल ठेवण्यात आला होता. त्यानंतर मात्र संपूर्ण कंटेनरमध्ये फटाक्यांची बेकायदेशीरपणे साठवण करण्यात आल्याचे तपासात उघड झाले.

तपासणीदरम्यान तब्बल 19,800 फटाके, ‌‘288 गॅटलिंग‌’ या प्रकारातील असल्याचे नमूद करण्यात आले असून, त्यांचे एकूण वजन सुमारे 10 हजार किलो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील या मालाची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये असल्याचे डीआरआयने सांगितले. हा संपूर्ण माल सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत जप्त करण्यात आला आहे.

व्यावसायिक मालवाहतुकीच्या मार्गाचा गैरवापर करून प्रतिबंधित वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी डीआरआयने केलेली कारवाई महत्त्वाची ठरली आहे. मात्र, या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत? माल नेमका कुठे जाणार होता? या नेटवर्कचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे बाकी आहे.

जेएनपीएच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रतिबंधित मालाची वाहतूक करण्याचा प्रयत्न होत असेल, तर बंदरातील कंटेनर तपासणी आणि सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ जप्ती आणि अटकेपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण तस्करीचे जाळे उघड करण्याची आवश्यकता आहे.

Exit mobile version