उरणमध्ये मौल्यवान कलाकृतींची तस्करी;लॅरी नॉर्टन, लॅम्बार्ट या प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचा समावेश

। उरण । घन:श्याम कडू ।
जेएनपीए बंदरात तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाचेही या तस्करांकडे बारीक लक्ष असते. सीमा शुल्क विभागाने केलेल्या 2 तपासणी मोहिमेत 3 कोटींच्या 32 मेट्रिक टन नेकट्राईन फळांच्या साठ्यासह अघोषित मौल्यवान कलाकृती, प्राण्यांचे कातडे असा तब्बल करोडोंचा माल न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाने जप्त केला आहे. यावरून जेएनपीए बंदर हे तस्करांचा अड्डा असल्याचे उघड होत आहे.

मंगळवारी (दि. 8) दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका कंटेनरमधून झेब्रा प्राण्याचे कातडे, अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ कलाकृती, लॅरी नॉर्टन, लॅम्बार्टसारख्या जगप्रसिद्ध चित्रकारांची 38 दुर्मीळ चित्रे, ज्यांची किंमत करोडोंच्या घरात आहे, असा ऐवज हस्तगत करण्यात आला.

एक दिवसापूर्वी इराणीयन किवी फळांच्या 177 मेट्रिन टनाच्या कंटेनरच्या तपासणीत 3 कोटी रुपयांचे 32 मेट्रिक टन नेकट्रराईन फळ आढळले, तर मंगळवारी गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीमा शुल्क विभागाने कंटेनरची तपासणी केली. कागदोपत्री घरगुती वस्तू असल्याचे नमूद होते. मात्र, प्रत्यक्षात दुर्मिळ वस्तूंची तस्करी करण्यात येत असल्याची बाब समोर आली.

या कारवाईत झेब्रा प्राण्याच्या कातड्यासह मौल्यवान कलाकृती आणि लॅरी नॉर्टन, लॅम्बार्टसारख्या प्रमुख चित्रकारांची 38 दुर्मीळ चित्रे जप्त केल्याची माहिती न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाने दिली. यापूर्वीही अनेकवेळा जेएनपीए बंदरातून अनेक प्रकारच्या तस्करी उघड झाल्या आहेत.

गेल्या सहा सात महिन्यांपासून अनेक वेळा तस्करी करताना साठा पकडण्यात आला आहे. तरीही तस्करी सुरूच आहे. यावरून बंदरातील इतर यंत्रणांचा या तस्करीमध्ये संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तस्करी करणार्‍यांबरोबर जेएनपीए व ज्या यार्डमध्ये सापडला आहे, याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

Exit mobile version