स्नेहल जगताप यांचा 6 मे रोजी शिवसेनेत प्रवेश

कृषीवलचे वृत्त खरे ठरले

| महाड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा क्षेत्राचे  माजी आमदार व काँग्रेस नेते स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या सुकन्या तथा महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे  गुरुवारी (दि.20) माजी केंद्रीय मंत्री व शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी महाडमध्ये सांगितले. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. स्नेहल जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाची बातमी रायगडच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे, परंतु अधिकृत घोषणा दोन्ही बाजूंनी अद्याप तरी झालेली नव्हती. आता मात्र त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याशिवाय कृषीवलमधूनही स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशाचे वृत्त दि.14 एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केलेले होते.


गीते हे महाडमध्ये आले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांची 6 मे रोजी चांदे क्रीडांगण महाड येथे जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांचा उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश होणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे या होणार्‍या सभेच्या पार्श्‍वभूमीवर सर्व रायगड जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह चांदे क्रीडांगणाची पाहणी देखील गीते यांनी केली. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते हनुमंत उर्फ नाना जगताप व जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख हे तिथे जातीने उपस्थित होते.

मागील काही दिवस स्नेहल जगताप यांच्या प्रवेशाबाबत रंगलेल्या उलट सुलट चर्चाना अनंत गीते यांच्या वक्तव्यामुळे आता पूर्णविराम मिळाला असून आमदार भरतशेठ गोगावले यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून खेळल्या गेलेल्या या चालीमुळे  महाड विधानसभा क्षेत्रातील राजकीय वातावरण मात्र आता रंगतदार अवस्थेत येणार हे नक्की.. सदरची सभा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असून या सभेमध्ये महाडच्या माजी नगराध्यक्ष सौ स्नेहल जगताप कामत, ज्येष्ठ नेते हनुमान जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असून ही सभा सायंकाळी पाच नंतर आयोजित करण्यात आली असल्याचे गीते यांनी सांगितले.

Exit mobile version