महाडमधून स्नेहल जगताप यांची उमेदवारी जाहिर

। रायगड । खास प्रतिनिधी ।

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरु असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी निश्‍चित झाली आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभेसाठी स्नेहल जगताप आणि कर्जतमधून नितीन सावंत यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुरुवारी (दि.17) मातोश्रीवर उपस्थित असलेल्या 13 विद्यमान आमदारांची उमेदवारी तसेच आणखी 6 जणांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते, असेही सूत्रांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात शिवसेना ठाकरे गटाच्या 19 जणांची उमेदवारी निश्‍चित झाली. तर 3 विद्यमान आमदारांना या बैठकीचे निमंत्रण दिले गेले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी थोडी अनिश्‍चित मानली जात आहे.

महाड मतदार संघातून स्नेहल जगताप यांचा सामाना हा शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांच्यामध्येच रंगणार आहे. लोकसभेच्या निवडणूकीत खासदार सुनील तटकरे यांना श्रीवर्धन मतदार संघात फक्त तीन हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तटकरेंना रोखण्यात महाडच्या शिवसेनेने चांगलीच फिल्डींग लावली होती. स्नेहल जगताप या काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूकी आधी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. काहीच दिवसांपूर्वी आमदार भरत गोगावले यांनी स्नेहल यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्यामुळे महिलांमध्ये आमदार गोगावले यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यांच्या या वक्तव्याचा फटका आमदार गोगावले यांना बसणार असल्याचे मानले जाते.

Exit mobile version